सायलेन्सरमध्ये ‘मॉडिफाय’ करून तसेच प्रेशर हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींविरुद्ध मुंबई वाहतूक पोलिसांच्या विशेष मोहीमेद्वारे ११ हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान १० हजार मॉडिफाय केलेले सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्न जप्त करून त्यांच्यावर रोड रोलर फिरविण्यात आले. वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या २० दिवसांच्या विशेष मोहीमेदरम्यान मोटार वाहन कायद्याच्या कलम १९४ (F) (हॉर्न आणि सायलेन्स झोनचा वापर) आणि कलम ११९ (२) (वाहनात बसवलेले किंवा बहु-हॉर्न वापरून कर्कश, मोठ्याने किंवा भयानक आवाज देणारी वाहने) अंतर्गत दंड ठोठावण्यात आला आहे. (Bike Silencers)
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने शहरातील दुचाकींमधून होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी २१ मे ते ११ जून दरम्यान एक विशेष मोहीम राबवली होती. या मोहीमेदरम्यान वाहतूक पोलिसांनी कानठळ्या बसवणारे तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ११ हजार ६३६ दुचाकी मालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत बुलेट, यामाहा तसेच सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या दुचाकींचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान २ हजार दुचाकींचे मॉडिफाय केलेले सायलेन्सर ८ हजार २६८ प्रेशर हॉर्न काढण्यात आले. याप्रकरणी ११ हजार ६३६ दुचाकी मालकांना मोटार वाहन कायद्याच्या कलम १९४ (F) (हॉर्न आणि सायलेन्स झोनचा वापर) आणि कलम ११९ (२) (वाहनात बसवलेले किंवा बहु-होन हॉर्न वापरून कर्कश/मोठ्याने किंवा भयानक आवाज देणारी वाहने) अंतर्गत दंड ठोठावण्यात आला आहे. (Bike Silencers)
(हेही वाचा – Hawkers Action : फेरीवाल्यांवरील कारवाईची मोहिम फसवण्याचा महापालिकेच्या पथकांचा असाही डाव?)
शुक्रवार सायलेन्सर (मॉडिफाय) आणि प्रेशर हॉर्नवर वरळी पोलीस मैदान, सर पोचखानवाला रोड, वरळी येथे रोडरोलर फिरवून नष्ट करण्यात आले आहे. यादरम्यान वाहतूक विभागाचे वरिष्ठ आणि प्रभारी पोलीस निरीक्षक तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुंबई वाहतूक विभागामार्फत वरील मोहीम ही यापुढेही सुरू राहणार असुन सर्व नागरिक व वाहन मालक आणि चालकांना वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे की, शहरात ध्वनी आणि वायू प्रदुषणात भर टाकणारे बदल केलेले (मॉडिफाय) सायलेन्सर व प्रेशर हॉर्नचा आपल्या वाहनांमध्ये वापर करु नये. त्याचप्रमाणे यापुढील कार्यवाहीमध्ये अशाप्रकारे बदल केलेले (मॉडिफाय) सायलेन्सर व प्रेशर हॉर्नचे निर्माते, वितरक आणि विक्रेते यांच्यावरही मुंबई वाहतूक विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. (Bike Silencers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community