- ऋजुता लुकतुके
अमेरिकेत झालेल्या गटवार साखळी सामन्यांपासून या टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. ए गटात पाकिस्तानचा संघ सुपर ८ मध्ये प्रवेशासाठी धडपडत होता. कॅनडाबरोबरचा शेवटचा सामना बाकी होता. तो खेळायची संधीही त्यांना मिळाली. पण, त्यांचा निकाल आधीच लागलेला होता. कारण, लाऊडरहिलमध्ये आधीचे तीन दिवस पडलेल्या वादळी पावसामुळे अमेरिका आणि आयर्लंड विरुद्धचा सामना वाहून गेला आणि त्याचा १ गुण मिळवून ते सुपर ८ मध्ये पोहोचलेही. उलट पाकिस्तानने भारत आणि अमेरिकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे फक्त दोनच गुण मिळवले होते. ४ सामन्यांतून त्यांचे झाले ४ गुण. तर अमेरिकेला पावसाचा एक गुण अतिरिक्त मिळाला. (T20 World Cup 2024)
पाकिस्तानने अमेरिकेविरुद्ध सामना गमावल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली हे कुणीही नाकारत नाही. पण, पावसाचा फटका त्यांना बसलाच. आताही सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजचं वातावरण सतत पावसाचं आणि खेळपट्टीवर परिणाम करणारं आहे. त्यातच दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना सरावाचा वेळही मिळत नाहीए आणि म्हणूनच वेळापत्रकावर टीका होतेय. (T20 World Cup 2024)
भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटल्याप्रमाणे, ‘अंतिम सामन्यापूर्वी सरावाचा दिवस मिळू न शकणे हे दुर्दैवं आहे.’ तर रशिद खाननेही अफगाणिस्तानला उपांत्य सामन्यापूर्वी पुरेशी झोपही न मिळाल्याची तक्रार केली आहे. त्यातच आता माजी इंग्लिश खेळाडू मायकेल वॉनने, ‘विश्वचषकाचं वेळापत्रक भारत धार्जिणं आहे,’ अशी टीका केली आहे. एका टीव्ही कार्यक्रमात मायकेल वॉनने तशी उघड टीका केली आहे. (T20 World Cup 2024)
The whole world 🌍 has been talking 💬 about India 🇮🇳 and their draw at the World Cup 🏆 so now it’s time to hear from Gilly and Vaughany who have strong 💪🏼 opinions on it all!#ClubPrairieFire pic.twitter.com/XZn38ROHuK
— Club Prairie Fire (@clubprairiefire) June 27, 2024
(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs SA : अंतिम सामन्यापूर्वी क्रिस गेलचा विराट कोहलीला पाठिंबा )
रोहितने केलं ‘हे’ सूचक विधान
‘आयसीसी या स्पर्धेचे आयोजक आहेत की, भारत? सगळं भारताच्या मनासारखं होतंय. ते सकाळी सामने खेळतायत, ते उपांत्य सामन्याचा दिवस ठरवतायत. ही काही दोन देशांमधील मालिका नाही. आयसीसी यावर काही ठरवणार की नाही? सगळ्यांना बरोबर घेऊन स्पर्धा भरवायची असेल तर सगळ्यांसाठी नियम सारखे हवेत आणि ते योग्यही हवेत,’ असं वॉनने या मुलाखतीत म्हटलं आहे. (T20 World Cup 2024)
वॉनला काही पाठिराखेही मिळालेत. तर काहींनी त्याला विरोधही केलाय. अगदी रोहित शर्मानेही फारसं भाष्य केलं नसलं तरी, ‘जे नियम आहेत ते सगळ्यांना सारखेच आहेत आणि स्पर्धेपूर्वी ते ठरले होते. सगळे सारख्याच परिस्थितीतून जातायत,’ असं सूचक विधान केलं होतं. तर हरभजन सिंगने वॉनला कडक शब्दांत सुनावलं आहे. दोघांमध्ये काही काळ यावरून द्वंद्ही रंगलं होतं. (T20 World Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community