ऑपरेशन ब्लू स्टार… 1 जून ते 8 जून 1984 दरम्यान पंजाबच्या सुवर्ण मंदिरात भारतीय सेनेकडून करण्यात आलेलं मोठं ऑपरेशन. असं ऑपरेशन जे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मृत्यूला देखील कारणीभूत ठरलं. याच ऑपरेशन ब्लू स्टारला आता 37 वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आतंकवादी संघटनांकडून एक नवं षडयंत्र रचण्यात येत आहे. कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिकेतील सिख फॉर जस्टिस, खलिस्तान सेंटर यांसारख्या संघटना ‘अमृतसर नरसंहार’ म्हणून ऑपरेशन ब्लू स्टारचे 37वे वर्ष साजरे करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी स्थानिक शीख तरुणांना प्रेरित करण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर यासाठी पैशांची लालूच सुद्धा दाखवण्यात आली आहे.
अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक दिवसांपासून, खलिस्तानी खलनायक समाजात तेढ निर्माण करणा-या पोस्ट करत आहेत. यात अग्रस्थानी आहे ते म्हणजे, कॅनडातील गुरुद्वारा साहिब दशमेश दरबार. या पोर्टलवर जनरल सिंह भिंद्रावालेच्या मृत्यूचा दिवस हा शहिद दिवस असल्याचा प्रचार केला जात आहे.
जगात भारताची बदनामी करण्याचा डाव
सिख फॉर जस्टिस संघटना शीखांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच पंजाबमधील स्थानिक लोकांची दिशाभूल करत आहे. तसेच शेतकरी संघटनांच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे भांडवल करुन, जगात भारताची बदनामी करण्याचा डाव या संघटनेने रचला आहे. धालीवाल आणि अनिता लाल यांसारख्या या संघटनेचे सदस्य असलेल्या लोकांनी रिहाना, ग्रेटा थनबर्ग यांच्यामार्फत चुकीचे टूलकिट ट्विटरवर पसरवत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता
काय आहे संघटनेचे पत्र?
हा मनसुबा पूर्ण करण्यासाठी सिख फॉर जस्टिसच्या अमेरिकेतील शाखेकडून, आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने अमृतसरच्या ज्ञानी हरप्रीत सिंह यांना एक पत्र लिहिले. या पत्रात ऑपरेशन ब्लू स्टारला अमृतसरमधील नरसंहार म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात संयुक्त राष्ट्र संघाच्या कायद्यांचा उल्लेख करत, पत्राच्या सुरुवातीलाच पंजाबला भारतापासून वेगळे करुन जनमताच्या आधारे स्वतंत्र खलिस्तान निर्माण करण्यासाठी, सिख फॉर जस्टिस प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे.
25 हजार डॉलर्सचे बक्षिस
खलिस्तानी आंतकवाद्यांच्या मृत्यूला शहीद दिवस म्हणून साजरा करण्यासाठी, खलिस्तान सेंटर आणि खलिस्तान डॉट ओआरजीद्वारे आतंकवादी डावपेच करण्यात येत आहेत. यासाठी अमृतसरमधील शीख तरुण आणि शेतक-यांना खलिस्तानी आतंकवाद्यांचे फोटो असणारे टी-शर्ट घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतकंच नाही तर ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये सहभागी असलेल्या भारतीय सेनेतील वीर योद्ध्यांची माहिती देणा-यांना, 25 हजार अमेरिकी डॉलर बक्षिस म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या गुरुद्वारात जात नाहीत भारतीय
कॅनडातील सरी याठिकाणी विमानतळाच्या बाजूला असलेल्या साहिब दशमेश दरबार या गुरुद्वारामध्ये, भारतीय शीख जात नाहीत. तिथे फक्त स्वतंत्र खलिस्तानला पाठिंबा असलेले आणि भारतात आतंकी चळवळींना प्रोत्साहन देणा-या शीखांनाच परवानगी देण्यात येते. या गुरुद्वारामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांचे फोटो आणि त्यांची माहिती देणारे लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यासाठी धालीवाल, अनिता लाल, जगमीत सिंह, हरजीत सिंह यांसारखे संघटनेचे सदस्य काम करत आहेत.
कोण आहेत या संघटनेचे सदस्य?
भारताविरुद्ध वेगवेगळ्या कुरघोडी करण्यासाठी या संघटनेच्या सदस्यांकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यांनी भारतातून पलायन केले आहे. त्यांना भारत भूमीबाबत कोणतीही आस्था किंवा देशप्रेम नाही. पण पंथाच्या नावाखाली पाकिस्तानसारख्या शत्रूच्या तालावर नाचण्यात आणि समाजात द्वेष पसरवण्यात, त्यांना फार मोठी धन्यता वाटते. यांचा संबंध बब्बर खालसा आणि खलिस्तान कमांडो फोर्सशी आहे.
इंग्लंडमधील नॅशनल सिख यूथ फेडरेशन(एनएसव्हायएफ) या संघटनेकडून आपल्या ट्विटर अकाऊंट आणि पोर्टलवर भिंद्रावाले आणि इतर आतंकी चळवळीत मारले गेलेल्या लोकांचे फोटो प्रसारित करुन, भारत विरोधी प्रचार केला जात आहे.
ਜੀਓੁਣਾ ਅਣਖ ਨਾਲ ਮਰਨਾ ਧਰਮ ਲਈ ⚔️ pic.twitter.com/4JHMB9FbE0
— ਦੀਪ ਕੌਰ (@RollinInTheD33P) June 4, 2021
खलिस्तानच्या मागणीवर पंजाबात आतंकी कारवायांना उत्तेजन देण्यासाठी, सिख फॉर जस्टिस आणि इतर काही संघटना विदेशातून काम करत आहेत. यासाठी ते स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरुन, खलिस्तानी आतंकवाद्यांचा विरोध करणा-यांना लक्ष्य करण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचत आहेत.
Join Our WhatsApp Community