मुंबईतील वरळी परिसरात ४५ वर्षीय व्यक्ती झाड पडून गंभीर जखमी झाल्यानंतर प्रभादेवी सयानी रोडवर कचरा वेचक महिलेचा झाड पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. वर्षा कांतीलाल मेस्त्री असे या कचरा वेचक महिलेचे नाव असून ती ५७ वर्षांची होती. (Tree Falls)
मुंबईत पावसाळ्यातील वादळीवाऱ्यांमुळे झाड उन्मळून तसेच धोकादायक फांद्या तुटून दुर्घटना होण्याची भीती लक्षात घेता महापालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने रस्त्या लगतच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. त्यामुळे पावसाळ्यापूर्व झाडांच्या धोकादायक फांद्यांची तसेच मृत झाडांची छाटणी केल्यानंतर मागील दोन दिवसांमध्ये झाड पडून जीवितहानी होण्याचे प्रकार घडत आहेत. (Tree Falls)
(हेही वाचा – Hawkers Action : फेरीवाल्यांवरील महापालिकेच्या कारवाईमुळे बोरीवलीकर खुश, मानले आमदारांचेच धन्यवाद)
वरळीतील जांभोरी मैदान चौकात सोमवारी रात्री झाड पडून ४५ वर्षी व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमित जगताप असे ४५ वर्षीय व्यक्तीचे नाव असून याची तब्येत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी रात्री ही घटना घडल्यानंतर मंगळवारी दुपारी परळ बस आगार येथील सयानी मार्गावर कचरा गोळा करणाऱ्या कचरा वेचक महिलेचा झाड पडून मृत्यू झाला आहे. या मार्गावरील झाड या महिलेच्या अंगावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु केईएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला होता, त्यामुळे रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केले. त्यामुळे दोन दिवसांमध्ये एक गंभीर जखमी आणि एका महिलेचा मृत्यू झाड पडल्याने झाल्याचे दिसून येत आहे. (Tree Falls)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community