शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र अजित पवारांनी चोरले असेल तर तो चोरीचा मालही विकत घालणारे तितकेच गुन्हेगार असतात, तोही गुन्हाच ठरतो, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला हाणला.
भाजपप्रमाणे सेनेलाही दुःख!
ज्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवतिर्थावरून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच वेळी भाजपाच्या नेत्यांनी जुनी जळमटे फेकून देऊन विरोधी पक्ष म्हणून काम सुरु केले पाहिजे, मात्र त्यांना जे अतीव दुःख झाले आहे, त्यातून ते बाहेर पडायला तयार नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले. ज्याप्रक्रारे भाजपाच्या नेत्यांना त्यांची सत्ता घेल्याचे दुःख होते तसेच शिवसैनिकांसाठी शिवसेनाप्रमुखांची खोली मंदिरासारखी आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाबाबत जो शब्द दिला होता, तो पाळला नाही, याचेही शिवसेनेला वाईट वाटते, असेही राऊत म्हणाले.
(हेही वाचा : विदेशी ‘वेगन’ दुधाला भारतात प्रस्थापित करण्यासाठी ‘पेटा’चे षड्यंत्र !)
राहुल गांधी बरोबर बोलतात!
राज्यांना लस पुरवण्याचा निर्णय उशिरा घेतल्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली ती रास्त आहे. राहुल गांधी यांनी कोरोनाची रुग्ण संख्या, लसीकरण यावर जी मते मांडली ती नंतर सत्य ठरली आणि सरकारलाही त्यावर अंमल करावा लागला आहे. त्यामुळे राहुल गांधी जे बोलतात ते योग्य असते, असेही राऊत म्हणाले.
केंद्रात मराठा आरक्षणाचा तोडगा निघेल!
राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा समाजाच्या संघटनांनी मोर्चे, आंदोलने काढण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच महाराष्ट्र कोरोनाच्या महामारीने झुंझत आहे. अशा वेळी राज्यातील वातावरण गढूळ करणे योग्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन या प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण हे आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणावर तोडगा निघेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community