मुंबईत पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने विविध यंत्रणांच्या सक्रीय सहभागाने उपाययोजना करण्यात येत आहेत. पावसाळी आजारांच्या वेळीच प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणात रूग्णांचा त्वरित शोध घेऊन तत्काळ उपचार करण्यासाठी यंदा संपूर्ण मुंबई महानगरात पावसाळी आजारांसाठी राखीव अशा ३ हजार रूग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तापसदृश आजारांसाठी ‘फिव्हर ओपीडी’ची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांनी पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी एकत्रित पद्धतीने प्रयत्न करावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. (BMC Hospital)
विविध शासकीय, निम-शासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी ३ जुलै २०२४ रोजी पार पडली. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, संचालक (वैद्यकीय शिक्षण) डॉ. नीलम अंद्राडे, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ, प्रमुख रूग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यासह मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय संस्था आणि प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आणखी एका बैठकीमध्ये विभागातील सहाय्यक आयुक्तांनाही पावसाळाजन्य आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. (BMC Hospital)
प्रमुख रूग्णालयांमध्ये तीन हजार रूग्णशय्यांची व्यवस्था
मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख चार रूग्णालयांमध्ये पावसाळी आजारांच्या उपचारासाठी एकूण ३ हजार रूग्णशय्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय (केईएम) ३० रूग्णशय्या, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालय १६२ रूग्णशय्या, बा.य.ल. नायर रूग्णालय ४११ रूग्णशय्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे डॉ. रू.न. कूपर रूग्णालय १०७ रूग्णशय्या तसेच उपनगरीय सर्वसाधारण रूग्णालयात ९६१ रूग्णशय्या याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे. (BMC Hospital)
(हेही वाचा – पक्षप्रमुखांनंतर अखेर Ambadas Danve यांनीही व्यक्त केली दिलगिरी; सभापतींना दिले पत्र)
पावसाळाजन्य आजारांचा अभ्यास केलेले अनुभवी डॉक्टर करणार मार्गदर्शन
मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रूग्णालयांमधील कम्युनिटी मेडिसिनमधील चार तज्ञ डॉक्टरांचा चमू प्रत्येक विभागामध्ये पावसाळी आजारांच्या उपाययोजनांसाठी मदतीला असणार आहे. या तज्ञ डॉक्टरांचा अनुभव तसेच वैज्ञानिक पद्धतीने रूग्ण हाताळण्याची उपचार पद्धती विभागांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये असणाऱ्या उणीवा भरून काढणे तसेच रूग्णसंख्या कमी करण्याच्या अनुषंगाने उपचार पद्धतीसाठीचे मार्गदर्शन या डॉक्टरांमार्फत अपेक्षित आहे. (BMC Hospital)
मुंबईत डेंगी आणि हिवताप (मलेरिया) रूग्णांची अधिक संख्या असलेल्या हॉटस्पॉटच्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रित (फोकाय) पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डेंगी आणि हिवतापाच्या अधिक रूग्णसंख्येच्या ठिकाणी अधिकाधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर महानगरपालिकेचा भर आहे. या विभागांच्या ठिकाणी वेळीच सर्वेक्षण मोहीम राबवत रूग्णसंख्या कमी करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (BMC Hospital)
आपला दवाखानामध्ये डेंगी, हिवतापाच्या मोफत चाचण्या उपलब्ध
तापसदृश्य लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी तत्काळ नजीकच्या रूग्णालयात चाचणी करून घ्यावी. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याठिकाणी डेंगी आणि हिवतापाच्या मोफत चाचण्या उपलब्ध आहेत. तापसदृश्य लक्षणे जाणवल्यास किंवा परिसरात डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आल्यास तत्काळ आपल्या नजीकच्या विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. विभागीय पातळीवर वॉर रूम तसेच शीघ्र प्रतिसाद चमुची नेमणूकही करण्यात आली आहे. तसेच पुरेशा प्रमाणात औषधांचा साठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. (BMC Hospital)
प्रमुख रूग्णालयात ‘फीव्हर ओपीडी’ ची सुविधा
तापसदृश्य उपचारांसाठी महानगरपालिकेच्या प्रमुख रूग्णालयांमध्ये २४ तास बाह्यरूग्णसेेवा उपलब्ध आहे. राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रूग्णालय दुपारी ४ ते रात्री १०, डॉ. रू.न. कूपर दुपारी २ ते रात्री ८, लोकमान्य टिळक सर्वसाधारण (शीव) रूग्णालय २४ तास, बा.य.ल नायर रूग्णालय दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत तर, उपनगरीय रूग्णालयात सायंकाळच्या वेळेत बाह्य रूग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (BMC Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community