अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केल्याने त्यांना धक्का बसला आहे. एवढेच नाही, तर खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. नवनीत राणा या 2019 साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
काय आहे न्यायालयाचा निकाल?
उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र सहा आठवड्यांच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसूळ यांच्या वतीने अॅड. सी. एम. कोरडे, अॅड. प्रमोद पाटील व अॅड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली.
(हेही वाचाः एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप नाही, पगारासाठी शासनाने तात्काळ निधी देण्याची मागणी )
तर खासदारकी धोक्यात
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याने, त्यांची खासदारकी धोक्यात आली असल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेलं प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटे ठरले, तर संबंधित सदस्याचे पद रद्द होऊ शकते.
नवनीत राणा यांच्या विषयी
2014 साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा आनंदराव अडसूळ यांनी पराभव केला होता. मात्र, 2019च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36 हजार मतांनी पराभव केला.
Join Our WhatsApp Community