- नित्यानंद भिसे
संसदेच्या अधिवेशनातील अत्यंत खेदजनक दृश्य अवघ्या देशाने पाहिले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर नवनियुक्त विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जे भाषण केले, त्यावर देशभर आता चर्चेला उधाण आले आहे. संसद, लोकसभा हे देशाचे सर्वोच्च स्थान आहे. लोकशाहीचे हे मंदिरच ! या ठिकाणी कायदे तयार होतात आणि याच ठिकाणी खासदार आपापल्या भागातील समस्या मांडून त्या सोडवून घेतात. या सभागृहात जसे लोकसभा अध्यक्ष हे पद सर्वाधिक महत्त्वाचे असते, तसेच सभागृह नेता म्हणून पंतप्रधान पदावरील व्यक्ती महत्त्वाची असते आणि विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेला विरोधी पक्षनेताही महत्त्वाचा असतो. या तिन्ही पदांना घटनात्मक संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळेच या तिन्ही पदांवर बसलेल्या व्यक्तींची सभागृहाची प्रतिमा उंचावण्याची अधिकची जबाबदारी असते.
विरोधी पक्षनेते म्हणून पहिल्याच परीक्षेत नापास
संसदेच्या अधिवेशनात नवीन कायदे निर्माण करणे, कायद्यांत सुधारणा करणे यासोबत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खासदारांनी मांडलेल्या त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील समस्यांचे निराकरण करणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मिळून सभागृह शांततेत, नियमात चालवले तर अधिवेशनाची फलनिष्पती अधिक मिळते. त्यासाठी विरोधी पक्षांची भूमिका विशेष महत्त्वाची असते. एखादा विषय पटला नाही, तर तो किती ताणून धरायचा, त्यासाठी अध्यक्षांनी म्हणणे ऐकून घेण्यासाठी किती वेळ गदारोळ करायचा याचे तारतम्य विरोधी पक्षांनी बाळगले पाहिजे. सभागृह नियमात चालवणे आणि न पटलेल्या मुद्यावर किती गदारोळ घालायचा या दोन्ही मुद्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) विरोधी पक्षनेता म्हणून पहिल्याच परीक्षेत सपशेल नापास झाले.
गांधी घराण्याच्या वंशजाचा अप्रत्यक्षपणे राज्याभिषेक
२०१४ आणि २०१९ या दोन टर्ममध्ये भाजपाने इतके संख्याबळ मिळवले की, १० वर्षे संसदेत विरोधी पक्षनेताच नव्हता. विरोधी पक्षातील कोणत्याच पक्षाला विरोधी पक्षनेत्यासाठी दावा करता यावा इतकी खासदारांची संख्या मिळवता आली नाही. हा १० वर्षांचा सलग काळ काँग्रेसला नुसता सत्तेपासून दूर राहण्याचाच नव्हता, तर पक्षाच्या अस्तित्वासाठी संघर्षाचाही होता. अशा काळात गांधी घराण्याचा वंश राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांत अयशस्वी लॉन्चिंग झाले. २०२४च्या निवडणुकीत चित्र बदलले. भाजपाचे संख्याबळ घटले. भाजपाने आता एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊन बहुमतासाठी काटावरचे संख्याबळ जमवले आणि तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. आज सभागृहात काँग्रेसकडे ९९ खासदार आहेत. त्या जोरावर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला. त्यावर राहुल गांधी यांची निवड झाली. मागील १० वर्षांचा काळ काँग्रेसला पर्यायाने गांधी घराण्याला सत्तेपासून दूर रहावे लागले, त्यामुळे गांधी घराण्यातील वंशाचा दिवा राहुल गांधी यांना सत्तेचे पद अनुभवता आले नाही. मात्र आता किमान राहुल गांधींना विरोधी पक्षनेते पदावर बसवून गांधी घराण्याच्या वंशजाचा अप्रत्यक्षपणे राज्याभिषेक झाला आहे.
(हेही वाचा Muslim : धर्मांध अदनानकडून हिंदू विद्यार्थिनीचा छळ; कुटूंबाला लोखंडी रॉडने मारहाण; कुटुंबिय घर सोडून गेले)
अपरिपक्वतेचे प्रदर्शन
बऱ्याच काळानंतर गांधी घराण्याला मिळालेला हा सन्मान कदाचित राहुल गांधींना पचवता आला नसावा. त्याचा प्रत्यय लोकसभेत आला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी यांनी ९० मिनिटे जे भाषण केले, ते अर्ध्याहून अधिक संसदेच्या नियमांचे उल्लंघन करणारे होते. यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अल्पसंख्याक, एनईईटी परीक्षा आणि अग्निवीर योजना यांसह विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. हिंदू समाजाला हिंसक म्हटले, नंतर सारवासारव करत त्यांनी भाजप आणि संघाला उद्देशून म्हटल्याचे सांगितले. राहुल गांधींनी भाषणात भगवान शिव, प्रेषित मोहम्मद, गुरु नानक, येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांच्या प्रतिमा दाखवल्या आणि काँग्रेसचे चिन्ह हाताचा पंजा म्हणजे अभय मुद्रा असून ती या सर्व देवता आणि प्रेषितांची मुद्रा असल्याचे म्हटले. त्याही उपर जात या सर्वांनी ‘डरो मत डराओ मत’ असे म्हटल्याचे सांगितले. प्रत्यक्षात असे कुणी देवता वा प्रेषिताने म्हटले नाही. राहुल गांधी यांनी खोटे बोलून सभागृहाची दिशाभूल केली. संपूर्ण हिंदू समुदायाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. राहुल गांधी यांच्या भाषणातील बराचसा भाग संसदेच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आला. उद्योगपती अदानी, अंबानी आणि अग्निवीर योजनेवर केलेल्या वक्तव्याचाही काही भाग काढून टाकण्यात आला. राहुल गांधींचे अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचे दावे फेटाळून लावले. अशा रीतीने राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान संसदेच्या ३४९, ३५२, १५१ आणि १०२ सह अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना शिकवले. जेव्हा अध्यक्षांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी अध्यक्षांच्या आसनाकडे गेले, त्याबाबत बोलतांना राहुल गांधी म्हणाले, अध्यक्षांनी मला सरळ हस्तांदोलन केले, पण पंतप्रधान मोदींना वाकून नमस्कार केला, असा दुजाभाव का केला? अध्यक्षांनी कुणासमोरही वाकायला नको, असे गांधी म्हणाले. त्यावर अध्यक्षांनी राहुल गांधी यांना, ‘मी संस्कृतीचे पालन केले. आपल्या वयापेक्षा मोठे असलेल्यांचा सन्मान करायचा असतो आणि वयाने बरोबरीचे असलेल्यांशी बरोबरीचे वर्तन करायचे’, असे सांगितले. राहुल गांधी यांनी अध्यक्षांच्या खुर्चीला शिकवण देण्याची घाई करून अपरिपक्वतेचे प्रदर्शन केले.
अर्ध्याहून अधिक भाषण काढून टाकले
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे विरोधी पक्षनेता म्हणून पहिले भाषण होणे आणि त्यातील अर्ध्याहून अधिक भाषण संसदेच्या रेकॉर्डमधून काढून टाकणे, ही त्यांच्यासाठी लज्जास्पद बाब आहे. या पदासाठी राहुल गांधी लायक आहेत का, असे कुणी म्हटले तर वावगे ठरणार नाही. यावर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यावर राहुल गांधी म्हणतात, ‘मला जे बोलायचे ते बोललो आहे, आता काय करायचे ते करावे.’ यावरून राहुल गांधी यांनी संसदेत रेकॉर्डसाठी हे भाषण केले नाही तर केवळ सवंग लोकप्रसिद्धीसाठी केले, हेच स्पष्ट होते.
काँग्रेसने संसद दावणीला बांधली
यावरून भाषणाच्या दरम्यान राहुल गांधी गंभीर नव्हते. ते ज्या पदावर बसले आहेत, ते पद आतापर्यंत अटलबिहारी वाजपेयी, एल. के. आडवाणी, पी. व्ही. नरसिंह राव, सुषमा स्वराज यांनी भूषवून उत्तम वत्कृत्व कौशल्याने या सभागृहाची प्रतिमा उंचावली. त्या पदावर बसून राहुल गांधी (Rahul Gandhi) या पदाची उंची कमी करत आहेत. सभागृहाची प्रतिमा खालावत आहेत. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी उत्तर देताना, शेलक्या शब्दांत राहुल गांधींच्या भाषणाचे वर्णन केले. राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे बालक बुद्धी, राहुल गांधी यांचे सभागृहातील वर्तन म्हणजे बालिशपणा होता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना भाषण करूच द्यायचे नाही, असे विरोधी पक्षांना सांगितले होते, म्हणून पंतप्रधान मोदी भाषणाला उठताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ सुरु केला. अध्यक्षांनी वारंवार समज देऊनही राहुल गांधी त्यांच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करत खासदारांना गोंधळ घालण्यासाठी प्रोत्साहन देत होते. विंगेत उतरून गोंधळ घालण्यासाठी इशारे देत होते. यावरून राहुल गांधी यांनी सभागृह शांततेत चालवण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेता म्हणून अजिबात पाळली नाही. या सर्व प्रकारावरून काँग्रेसने गांधी घराण्याच्या वंशाचा दिवा राजकारणात स्थिरस्थावर करण्यासाठी देशाच्या लोकशाहीचे मंदिर दावणीला बांधले आहे का? अशी शंका येते.
Join Our WhatsApp Community