दादर रेल्वे स्थानकाच्या समोरील केशवसुत उड्डाणपुलाखालील गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांकडून होणारे अतिक्रमण लक्षात घेता आता यातील एका गाळ्यात बेघरांसाठी रात्र निवारा केंद्र आणि शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी हा गाळा पत्र्यांनी बंदिस्त करण्यात आला असून या अंतर्गत भागांत निवारा केंद्र बांधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या गाळ्यामध्ये काही गर्दुल्ले आणि काही लोकांनी संसार थाटले होते, त्यामुळे या गाळ्यांमध्ये सर्वसाधारण माणसांना या गाळ्यांमध्ये प्रवेश करताही येत नव्हता. त्यामुळे महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचे रेल्वे प्रवाशांसह दादरमधील जनतेकडून स्वागत होत आहे. (Dadar)
दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला सेनापती बापट मार्गावरील केशवसुत उड्डाणपुलाखाली गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांनी जागा अडवून त्यामध्ये स्ट्रिट लाईटमधून विजेची चोरी करत आपले व्यवसाय थाटले होते. मागील काही वर्षांपासून गाळ्यांमधील जागा अडवून व्यवसाय करताना फेरीवाल्यांकडून पादचारी तसेच रेल्वे प्रवाशांसाठी जागाही सोडली जात नव्हती. त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना या गर्दीतून मार्ग काढत जावे लागत होते. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालेला असून येथील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी सर्वच स्तरातून होऊ लागली आहे. (Dadar)
(हेही वाचा – Assembly Session : मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
दरम्यान, महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याच्या मोहिमेमुळे दादर रेल्वे स्थानकाचा पश्चिम भागातील परिसर मागील आठ ते दहा दिवसांमध्ये फेरीवालामुक्त झाल्याचे दिसून येत आहे. तसेच येथील विजेच्या अनधिकृत जोडण्याही महापालिकेच्यावतीने तोडण्याण्यात आल्या आहेत. मात्र, येथील पणशीकर स्वीट्समोरील पुलाखालील गाळ्यांचा ताबा काही कुटुंबांकडून घेतला होता आणि यामध्ये काहींनी संसारच थाटल्याने या गाळ्यात जाण्याचे धाडस नागरिकांकडून केले जात नव्हते. परंतु आता याच गाळ्यात महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार बेघरांसाठी रात्र निवारा केंद्र आणि त्यात शौचालयाची व्यवस्था आदींचे बांधकाम केले जात आहे. त्यासाठी या गाळ्याच्या दोन्ही बाजुंनी पत्रे ठोकण्यात आले आहेत. (Dadar)
ज्या जागेत आता बेघरांसाठी रात्र निवारे बांधले जात आहेत, त्या जागेत अवनी ट्रस्टच्या झुणका भाकर केंद्राची जागा होती. सन २०१४मध्ये तत्कालिन जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी सर्व गाळेमुक्त केले होते आणि या गाळ्यांचे सुशोभीकरण करून रेल्वे स्थानकापर्यंत टॅक्सी येईल अशाप्रकारची रचना केली जाईल असा आराखडा आखला होता. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर या गाळ्यांमधील जागा फेरीवाल्यांनी अडवून त्या जागा भाड्याने दिले. परिणामी याठिकाणी फेरीवाल्यांची संख्या वाढली गेली. त्यामुळे हे सर्व मोकळे गाळे बंदिस्त करून त्या विविध संस्थांना भाडेतत्वावर दिल्यास त्यातून महापालिकेला महसूल प्राप्त होईल आणि या परिसरातील फेरीवाल्यांची संख्याही नियंत्रणात येईल असे बोलले जात आहे. (Dadar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community