महामार्ग (Highway) निर्मितीचे काम करताना पाण्याचा निचरा होणे महत्वाचे असते. त्यामुळे रस्ते काम करतानाच पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजनांचा रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविताना समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवार, १० जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य डॉ. राहूल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.यावेळी सदस्य नाना पटोले, प्रशांत बंब, सुरेश वरपुडकर, संजय सावकारे, अमित देशमुख, उदयसिंह राजपूत, संदीप क्षीरसागर यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री चव्हाण म्हणाले, परभणी – गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावरील (Highway) पी क्यू सी पॅनल्समध्ये भेगा पडल्याचे निदर्शनास आले. या महामार्गावर पडलेल्या भेगांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या मार्फत नेमलेल्या तांत्रिक सल्लागारांकडून त्रयस्थ पद्धतीने अंकेक्षण करण्यात आले. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पाण्याचा निचरा न झाल्यामुळे ओवर फ्लडींग होऊन रस्त्याच्या सबग्रेडमध्ये पाण्याचा अंश वाढल्यामुळे काही ठिकाणी काँक्रीट पी क्यू सी पॅनेल्समध्ये भेगा पडल्याचे निदर्शनास आले.
(हेही वाचा Saras Baug : सारसबागेत धार्मिक अतिक्रमण; नमाज पठण करणाऱ्यांना संरक्षण; शिववंदना म्हणणाऱ्यांची गळचेपी)
या पॅनेल्सची दुरुस्ती कंत्राटदाराने आय.आर.सी. मानकानुसार स्व-खर्चाने पूर्ण केलेली आहे. तसेच पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस कच्ची गटारे व गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूस काँक्रीट ड्रेन बांधण्यात आली आहेत. कंत्राटदाराने केलेल्या पी क्यू सी पॅनेल्स दुरुस्तीकामाची आय. आय. टी., रुरकी व सेवानिवृत्त मुख्य अभियंता यांच्या टीममार्फत तपासणी करण्यात आली असून त्यांच्या अहवालानुसार दुरुस्तीचे काम आय. आर. सी. मानकानुसार योग्यप्रकारे झाले आहे. सद्यःस्थितीत सदर रस्ता वाहतुकीस सुस्थितीत आहे.
जिंतूर- परभणी व पाथरी- परभणी या राष्ट्रीय महामार्गाच्या (Highway) प्रलंबित कामाबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची बैठक घेवून उर्वरित कामाची सुरुवात करण्यात येईल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.