म्युकरमायकोसिस झाला, दीड कोटींचा खर्च केला, तरीही डोळा गमावला! 

नवीन पॉल यांच्या म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी पॉल दाम्पत्याने पीएफ, बचत खात्यातील रक्कम, सगळे दागिने गहाण ठेवून जमवलेली रक्कम आणि नातेवाईक, मित्रमंडळींनी केलेली मोठी आर्थिक मदत असे मिळून तब्बल दीड कोटी खर्च केले. 

163

कोरोना जसा तुमच्या आमच्यामध्ये ठाण मांडून बसला आहे, तसा या कोरोनाच्या मागोमाग म्युकरमायकोसिस नावाचा रोगही आता बस्तान मांडत आहे. फरक इतकाच आहे. कोरोना झाल्यावर त्यातून चुटकीसरशी बरे होणे शक्य झाले आहे. मात्र त्यानंतर म्युकरची लागण झाल्यास नुसती रुग्णाचीच नव्हे, तर अवघ्या घराची फरफट होते. त्याच्या उपचारासाठी जमवलेली सर्व पुंजी, दागदागिने विकण्याची वेळ येते. त्याबरोबर एक किंवा दोन्ही डोळे हा रोग हिसकावून घेतो. किमान ४-५  शस्त्रक्रियांपासून ते तब्बल १०-१२ शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्यातून जीव वाचला तर रुग्ण आपला, नाहीतर देवाचा, असे म्हणायची वेळ येते.

कोरोनामुळे म्युकरमायकोसिस झालेला राज्यातील पहिला रुग्ण! 

ही गोष्ट महाराष्ट्रातील कोरोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस झालेल्या पहिल्या रुग्णाची आहे. नवीन पॉल (वय ४६) असे त्या रुग्णाचे नाव. जीएसटी विभागात कामाला असलेले नवीन पॉल यांना सप्टेंबर २०२० च्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना झाला. त्यातून ते बरे झाले. मात्र त्यानंतर त्यांचा चेहरा दुखायला लागला आणि नवीन पॉल यांचा सुरु झाला दुसरा संघर्ष. साधारण ऑक्टोबर महिन्यापासून पॉल यांना ही लक्षणे दिसू लागली. त्यावेळी कोरोनामुळे म्युकरमायकोसिस होतो, याविषयी अभ्यास समोर आला नव्हता. म्हणून म्युकरचे निदान होण्यासाठी महिन्यांचा अवधी लागला. सुरुवातीला नवीन हे नागपुरातील एका न्यूरॉलॉजी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाले. तेथून त्यांना हैदराबादच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथील उपचारानंतर पुन्हा नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. तेथेही काही शस्त्रक्रियांनंतर मुंबईतील एका नामांकित कार्पोरेट रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तिथे म्युकरचे निदान झाले. त्यांच्यावर तिथे तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

(हेही वाचा : म्युकरमायकोसिस: उपचार नको डोळेच काढा! असे म्हणतील गोरगरीब!  )

८ महिन्यांत १३ शस्त्रक्रिया!

मागील ८ महिने नवीन पॉल यांच्यावर नागपूर, हैद्राबाद आणि मुंबई येथील सहा मोठ्या रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार झाले.  त्या दरम्यान सायनस, डोळे आणि जबड्यावर 13  शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 50च्यापेक्षा जास्त स्कॅन, एक्से, एमआरआय काढले. मुंबईतील रुग्णालयात तब्बल 19 लाख रुपयांचा खर्च आला. त्यापूर्वी उपचारादरम्यान 45 लाखांचा खर्च झाला होता. त्यामुळे मुंबईतील खर्च परवडणार नसल्याने ते पुन्हा नागपुरातील मेडिट्रिना या खासगी रुग्णालयात दाखल झाले. या खासगी रुग्णालयाचा रेल्वेशी मेडिकल करार आहे. पॉल यांच्या पत्नी संगिता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत आहेत. या रुग्णालयात त्यांचा एक डोळा आणि वरचा जबडा काढावा लागला. ३  महिन्यांच्या उपचारानंतर म्हणजे मार्च २०२१पर्यंत पोल त्यांच्यात सुधारणा झाली.

दागदागिने गहाण ठेवले, पीएफ, बचत रकम काढली!

46 वर्षीय नवीन पॉल यांचा म्युकरमायकोसीसविरुद्धच्या संघर्षाची कहाणी सांगताना ते आणि त्यांच्या पत्नी संगिता यांना अश्रू आवरता येत नाही. एक दोन महिने नव्हे तब्बल 8 महिने नवीन पॉल यांचा म्युकोरविरुद्धचा लढा सुरु होता. म्युकरच्या उपचाराकरिता लागलेला खर्च तर सुन्न करणारा आहे. त्यांना आतापर्यंत तब्बल 1.5 कोटी रुपयांचा खर्च उपचाकाराकरिता  झाला आहे. उपचारादरम्यान नवीन पॉल यांचा औषधाेपचाराचा दिवसाचा खर्च लाखोंत घरात होता. पॉल दाम्पत्याने  पीएफमधील रक्कम असो वा बचतीची जमा केलेली सर्व रक्कम उपचारावर खर्च केली. संगीता यांनी घरचे सगळे दागिने गहाण ठेवले. शिवाय नातेवाईक आणि मित्रमंडळींनी मोठी आर्थिक मदत केली. म्युकर उपचारांकरता झालेला दीड कोटींचा खर्च, आठ महिन्यांचा कालावधी आणि यानंतर गमावाव लागलेला एक डोळा यातून आता नवीन पॉल पुन्हा नव्या उमेदीने कार्यालयात रुजू झाले आहेत.

राज्यात म्युकरचे ६,३५३ रुग्ण! 

पॉल दाम्पत्यांनी उपचाराचा खर्च भागवण्यासाठी होते नव्हते ते सर्व खर्च केले, मात्र समाजात सर्वांनाच हे जमेल असे शक्य नाही. भारतात आजच्या तारखेपर्यंत म्युकरचे २८ हजार २५२ रुग्ण आहेत, त्यातील एकट्या महाराष्ट्रात ६ हजार ३५३ रुग्ण आढळून आले आहेत. अशा रुग्णांवर सध्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांतही उपचार होतात. मात्र ही रुग्ण संख्या वाढत गेल्यास त्याप्रमाणात सरकारी रुग्णालयात उपचार करणे शक्य होणार नाही, अशा वेळी खासगी रूग्णालयांतही उपचार करावे लागल्यास त्यांचा कोटीच्या घरात खर्च जात आहे. हा सर्वसामान्यांना नक्कीच परवडणारा नाही.

(हेही वाचा : आता म्युकरमायकोसिसच्या औषधाचा काळाबाजार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.