जयपूर विमानतळावरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका महिला CISF च्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावतानाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत दिसणारी महिला स्पाईसजेट (SpiceJet) विमान कंपनीची कर्मचारी असून तिथे नेमकं काय घडलं? याबाबत कंपनीकडून त्यांची बाजू मांडण्यात आली आहे. त्याशिवाय, संबंधित सीआयएसएफच्या अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणार असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
STORY | SpiceJet employee slaps CISF man in argument over security check at Jaipur airport, arrested
READ: https://t.co/snXzE4ANsx
VIDEO:
(Source: Third Party) pic.twitter.com/MdfwNVKtDA
— Press Trust of India (@PTI_News) July 11, 2024
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन महिला सीआयएसएफचे जवान व दोन विमानतळ कर्मचाऱ्यांशी बोलत असल्याचं दिसत आहे. संबंधित अधिकारी या महिला कर्मचाऱ्याला काहीतरी सांगत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र अचानक या महिलेनं बोलणाऱ्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतरही या महिलेकडून आक्रमकपणे वाद घातला जात असल्याचं दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आवाज येत नसल्यामुळे नेमकी दोघांमध्ये चर्चा काय होत आहे? याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, याबाबत स्पाईसजेट कंपनीनं अधिकाऱ्याचीच चूक असल्याचा दावा केला आहे.
नेमकं घडलं काय?
हा सगळा प्रकार गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास जयपूरच्या विमानतळावर घडला. विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ सीआयएसएफचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीराज प्रसाद यांनी स्पाईसजेट कंपनीच्या या महिला कर्मचाऱ्याला अडवलं. स्क्रीनिंग करण्यासाठी या महिला कर्मचाऱ्याला सांगण्यात आलं. मात्र, त्यावेळी तिथे सीआयएसएफची कोणतीही महिला कर्मचारी उपस्थित नव्हती. त्यामुळे वाद सुरू झाला. यासंदर्भात विमानतळ प्रशासनाचे अधिकारी राम लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीराज प्रसाद यांनी त्यानंतर त्यांच्या महिला सहकाऱ्याला पाचारण केलं. पण वाद वाढत गेला आणि स्पाईसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने गिरीराज प्रसाद यांच्या कानशिलात लगावली.
दरम्यान, घडल्या प्रकाराबाबत सीआयएसएफनं विमानतळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. डीसीपी कवेंद्र सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसला याबाबत माहिती दिली. “या महिला कर्मचाऱ्याला अटक केली असून त्यांची चौकशी चालू आहे. सदर महिलेनंही तक्रार दाखल केली आहे. आम्ही सर्व तथ्यांची तपासणी करत असून योग्य ती कारवाई केली जाईल.” असं सिंह म्हणाले.
स्पाईसजेट कंपनीचा दावा काय?
या सर्व घडामोडींमध्ये स्पाईसजेट विमान कंपनीनं त्यांच्या महिला कर्मचाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं स्पष्ट केलं आहे. “आज जयपूरच्या विमानतळावर एक दुर्दैवी प्रकार घडला. स्पाईसजेटच्या महिला कर्मचारी व सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. स्टील गेटजवळून केटरिंग कार घेऊन जात असताना आमच्या कर्मचाऱ्याला अडवण्यात आलं. त्यांच्याकडे वैध ओळखपत्र व कागदपत्र असूनही त्यांच्याशी बोलताना सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. ‘कामाची वेळ संपल्यानंतर माझ्या घरी येऊन भेट’ असंही त्यांना सांगण्यात आलं. आमच्या कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई करणार असून स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आम्ही आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी बांधील आहोत.” असा गंभीर दावा स्पाईसजेटकडून करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community