मागील रविवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे अनेक भागांमध्ये पाणी साचून मुंबई जलमय झाली. मात्र, यंदा रेल्वे हद्दीत पाणी साचणार नाही असा दावा केला जात असतानाच सोमवारी पहाटेपासूनच शीव आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानकांच्या भागांमध्ये पाणी साचले गेले. यामुळे अनेक तास मध्य आणि हार्बरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली. परंतु चुनाभट्टी येथील हाय वे सोसायटीतील पंपाद्वारे रेल्वे मार्गात पाणी सोडल्याने रुळांवर पाणी साचल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. त्यामुळे आधीच रेल्वेने आपल्या हद्दीत साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप न लावता आपल्यावरील जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. (Heavy Rain)
सोमवारी मुंबईतील अनेक भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेला टिकेचे धनी व्हावे लागले. या पहिल्याच मुसळधार पावसात कधीही पाणी साचलेल्या भांडुप रेल्वे स्थानकांच्या परिसरात प्रथमच पाणी साचून राहिले होते. या भांडुप बरोबरच मध्य रेल्वेच्या शीव स्थानक आणि हार्बर रेल्वेच्या स्थानकाच्या चुनाभट्टी रेल्वे स्थानकांच्या परिसरात पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. (Heavy Rain)
(हेही वाचा – Milind Narvekar जिंकले, तर Jayant Patil यांचा पराभव; काँग्रेसची मते फुटली)
चुनाभट्टी रेल्वे स्थानकाच्या परिसरात साचलेल्या पाण्याचे खापर रेल्वेने नजिकच्या हाय वे सोसायटीवर फोडल्याचे बोलले जात आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकाच्या समोर असलेल्या हाय वे सोसायटी ही मोठी असून याठिकाणी पाणी साचले जाते. या सोसायटीत साचल्या जाणाऱ्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी सोसायटीच्यावतीने पंप लावले जाते. हे पाणी त्यांनी रेल्वे हद्दीत सोडल्याचा दावा रेल्वेकडून प्राधिकारणाच्या बैठकीत केल्याचे बोलले गेले. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या सोसायटीची पाहणी केल्यानंतर हाय वे सोसायटीतील जमा होणारे पाणी पंपाद्वारे बाजुच्या सोसायटीमधून जाणाऱ्या समांतर नाल्यात सोडले जाते. हा नाला चुनाभट्टी रेल्वे हद्दीतून जात आहे. (Heavy Rain)
मात्र, महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हाय वे सोसायटीतील पाणी पंपाद्वारे नाल्यात सोडले जात असले तरी त्यांचे प्रमाण केवळ २० टक्केच आहे. हा नाला रेल्वे हद्दीतून जात असल्याने तसेच याठिकाणी पाणी साचले जात असल्याने रेल्वेच्यावतीने पंप लावणे आवश्यक आहे. परंतु रेल्वेने तीसुद्धा खबरदारी घेतली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रेल्वेचे अधिकारी यांची आता संयुक्त पाहणी आयोजित करून त्याठिकाणी पुन्हा पाणी साचणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे, त्यादृष्टीकोनातून प्रयत्न महापालिकेच्यावतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हाय वे व बाजुच्या सोसायटीमधून जाणाऱ्या नाल्यातील पाणी अन्य मार्गाने वळवता येईल का याचाही अभ्यास करून तोडगा काढला जाणार आहे, जेणेकरून हे पावसाचे पाणी रेल्वे रुळांवर जाणार नाही, अशी माहिती मिळत आहे. महापालिकेने याबाबतचा व्हिडीओही तयार केला असून त्यानुसार वस्तुस्थिती प्राधिकरणासमोर मांडली जाणार असल्याचे बोलले जात आहे. (Heavy Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community