आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम करतायेत; Chhagan Bhujbal यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता.

247
आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचे वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे मारले आहे? हे सगळे मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत, आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम काही लोक करत आहेत असा गंभीर आरोप राज्याचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.
अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केले. आरक्षणाचा वाद मिटावा म्हणून सह्याद्री भवनावर सरकारने मिटिंग बोलवली होती. सर्वपक्षीय नेत्यांना बोलवण्यात आले होते. विरोधी पक्षातले नेते येणे क्रमप्राप्त होते. आम्ही विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड या सगळ्यांना सांगितले होते. शरद पवारांनाही या बैठकीला बोलवा हे सांगितले होते. व्ही.पी. सिंग यांनी जे आरक्षण दिले त्याची अंमलबजावणी शरद पवारांनी केली म्हणून आम्ही आजवर त्यांचे आभारही मानले. मात्र ज्यावेळी आरक्षणाच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत असतात तेव्हा अपेक्षा हीच असते की शरद पवारांनी बैठकीला यायला हवे होते, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जातायेत 

राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. त्यानंतर पाठीमागून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे. आम्ही सगळ्या विरोधी पक्षांना सांगतो आहे की, सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम बहिष्कार टाकायचा, मुद्दाम तिथे यायचे नाही हे योग्य नाही. निवडणूक असेल तेव्हा तुमचे झेंडे हाती घ्या, तुमचे मुद्दे मांडा. आम्ही आमचे मुद्दे मांडतो, आमचे झेंडे हाती घेतो. मात्र सामाजिक प्रश्नी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, हे अजिबात योग्य नाही. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व समाजाचे लोक आहेत. सगळे आमचे आहेत आणि तुमचेही आहेत. एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सुबुद्धी देओ, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.