कोकणात गेल्या दोन दिवसापासून पावसाने थैमान (Konkan Rain) घातले आहे. रत्नागिरी आणि रायगडमधील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अशा परिस्थितीमुळे शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे.
नागरिकांचे स्थलांतर
मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आला असून, खेड बाजारपेठेत पाणी शिरले. अनेक दुकानांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. खेड शहरातील नदीकाठच्या १७७ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. चिपळूण बाजारपेठेतही पाणी साचले. चिपळूण नाका येथे ४१, तळ्याचे वाकण परिसरात ८४ नागरिकांचे प्रशासनाने स्थलांतर केले. चिपळूण शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या चिंचनाका परिसरातही पाणी शिरले. वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली होती. (Konkan Rain)
वाहनांच्या मोठ्या रांगा
कोकण रेल्वे मार्गावर दिवाण खवटी आणि खेड या स्थानकांदरम्यान रविवारी दरड कोसळली. त्यामुळे या पट्टयात कोकण रेल्वेची वाहतूक बंद ठेवण्यात आली. रेल्वे मार्गावरील दरड दूर करण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दुसरीकडे, खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील चिंचघर, बोरघर येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. (Konkan Rain)
प्रवासी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना त्रास
जुन्या गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून, या महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहने खड्ड्यात आदळून अपघात होत आहेत. पेण बसस्थानकात पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले असून, येथून प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अलिबाग, पेण, म्हसळा, तळा आणि माथेरान परिसरात सरासरी २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. खंडाळा आणि खोपोली परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरही पाणी साचले होते. यामध्ये अमृतांजन पुलाजवळच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहने कासवगतीने चालवावी लागत होती. (Konkan Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community