देशाची राजधानी दिल्लीत भगवान श्री केदारनाथ यांच्या मंदिराचे निर्माण करण्याच्या मुद्यावरून महाभारत सुरू झाले आहे. मंदिराचे निर्माण बुराडी येथे केले जाणार आहे आणि भूमिपूजन समारंभाला उत्तराखंचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी उपस्थित होते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक बाबा केदारनाथ यांच्या मंदिराच्या निर्माण कार्यावरून देशाच्या राजधानीतील वातावरण तापले आहे. श्री केदारनाथ धाम ट्रस्टच्यावतीने दिल्लीतील बुराडी येथे केदारनाथ मंदिर बनविले जात आहे. याचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. (Kedarnath Dham)
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पाडल्यामुळे उत्तराखंडसह दिल्लीतही विरोध प्रदर्शन केले जात आहे. केदारनाथ धामापासून ते केदारनाथ घाटीपर्यंतच्या लोकांनी दिल्लीतील मंदिराला विरोध दर्शविला आहे. यामुळे कॉंग्रेस पक्षाला भाजपावर शरसंधाण साधण्याची आयती संधी मिळाली आहे. भाजपाच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री धामी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ‘केदारनाथ धाम एकच आहे आणि एकच राहणार आहे. केदारनाथ धाम कधीही दुसरे होऊ शकत नाही. दिल्लीत जे मंदिर निर्माण केेले जात आहे ते केदारनाथची प्रतिकृती होय. देशाच्या विविध भागात प्रतिकात्मक पद्धतीने मंदिरे बांधली गेली आहेत, मात्र त्यातील कोणत्याही मंदिराला धाम म्हटले जात नाही’. (Kedarnath Dham)
(हेही वाचा – Kerala : चेकअपसाठी रुग्णालयात आला आणि लिफ्टमध्ये अडकला; दोन दिवसांनी सुटका)
दिल्लीतील केदारनाथ मंदिर श्री केदारनाथ धाम ट्रस्टच्यावतीने बुराडी येथे उभारले जात आहे. याचा उत्तराखंड सरकारशी काहीही संबंध नाही, असा खुलासा ट्रस्टच्यावतीने करण्यात आला आहे. ट्रस्टचे म्हणणे आहे की, यापूर्वी देशात अनेक ठिकाणी विविध प्रतिष्ठित धाम आणि मंदिरांची प्रतीकात्मक मंदिरे बांधण्यात आली होती. अशा परिस्थितीत दिल्लीतील केदारनाथ मंदिराच्या बांधकामाला वादाचा विषय बनवता कामा नये. काही लोक विनाकारण अतिशयोक्ती करून या प्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा आरोप ट्रस्टने केला आहे. दुसरीकडे, मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने दिल्लीतील केदारनाथ मंदिराच्या उभारणीचा मुद्दा बनवून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी चालविली आहे. (Kedarnath Dham)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community