मविआ सरकारपासून रखडलेल्या विधान परिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड आता महायुती सरकारच्या काळात केव्हाही होणार आहे. त्यासाठी महायुतीतील घटक पक्षांतील फॉर्म्युलाही ठरला आहे. भाजपा ६ आणि शिंदे गट आणि अजित पवार गट प्रत्येकी ३ आमदार वाट्याला येण्याची शक्यता आहे. मात्र यात अजित पवार गट एक मुसलमानाला संधी देणार आहे, तसे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यपालांना विधान परिषदेवर १२ आमदार नियुक्त करण्याचा अधिकार असतो. मात्र, त्यासाठीची शिफारस राज्य मंत्रिमंडळ करत असते. भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने १२ सदस्यांच्या नावांची शिफारस कोश्यारी यांच्याकडे केली होती. पण कोश्यारी यांनी शेवटपर्यंत त्या नियुक्त्या केल्या नाहीत. नियुक्तीची शिफारस राज्य सरकार करू शकते पण त्या कधी कराव्यात याविषयी कायद्यात स्पष्ट तरतूद नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आणि तेव्हाचे राज्यपाल कोश्यारी यांच्यात अनेक मुद्यांवर मतभेद झाले. त्यावेळच्या मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या नावांची नियुक्ती होऊ शकली नव्हती. नंतर हे प्रकरण न्यायालयातही गेले, आताही ते न्यायप्रविष्ट आहे.
(हेही वाचा Congress मध्ये धुसफूस; विधान परिषद निवडणुकीनंतर नाराज आमदारांविषयी चर्चेला उधाण )
विधान परिषदेत एकही मुसलमान आमदार नाही
अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, महायुतीत १२ पैकी किती जागा कोणाला मिळतील हे अद्याप ठरलेले नाही पण ३१ ऑगस्टपर्यंत या नियुक्त्या होतील, असा आम्हाला विश्वास आहे. ६-३-३ असा फॉर्म्युला ठरू शकतो. भाजपाला ६ आणि शिंदे सेना व अजित पवार गटाला ३ आमदारकी मिळतील, असे मानले जाते. अजित पवार म्हणाले की, आम्ही मुस्लीम उमेदवार देऊ. विधान परिषदेत आज एकही मुस्लीम आमदार नाही या १२ सदस्यांमध्ये आमच्यातर्फे एका मुस्लीम व्यक्तीला संधी दिली जाईल, असे पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community