भारतीय हवामान विभागामार्फत नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, १३ व १४ जून या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील समुद्र किनारे व लगतचा परिसर इत्यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे. तसेच या अनुषंगाने सुनिश्चित कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्यात आली आहे.
अशी आहे महापालिकेची तयारी
- विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला असून, सर्व यंत्रणा सुसज्ज व सतर्क आहेत.
- मुंबई महापालिकेचे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष हे आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज आहेत.
- पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे व विविध ठिकाणी बसवण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे उदंचन संच कार्यरत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे. याकरिता आवश्यक त्या डिझेलची व्यवस्थादेखील स्थानिक उदंचन संच चालकांद्वारे करण्यात आली आहे.
- मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत.
- राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक हे आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरता तत्पर आहे.
- भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून, ते देखील आवश्यकतेनुसार मदतीकरता तत्पर आहेत.
- बेस्ट (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यांची मदत पथके सुसज्ज व सतर्क आहेत.
- मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व कार्यतत्पर आहे.
- अणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलिस, अग्निशमन दल, वाहतूक पोलिस, बेस्ट (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांचे समन्वय अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.
- मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आल्या आहेत. त्वरित मदतीकरता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडी तेथे तैनात करण्यात आली आहे.
- शिक्षण अधिकारी यांना महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या महापालिका शाळा त्वरित मदतीकरता सुसज्ज आहेत.