पिंपरीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) घड्याळ भेट दिले, त्या घड्याळात असलेल्या टायमिंगवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. तुमचे बारा वाजायला फक्त दहा मिनिटं शिल्लक आहे, हेच यातून दाखवते, असा टोला सोशल मीडियावरुन लगावण्यात आला.
नेमके काय घडले?
अजित पवारांच्या (Ajit Pawar) पिंपरी येथील मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांना घड्याळ भेट दिले. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी भेट दिलेल्या घड्याळात 12 वाजण्यासाठी केवळ 10 मिनिटांचा अवधी असल्याचे छायाचित्रा दिसून येत आहे. त्यावरुन, आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांवर निशाणा साधला आहे. स्वतः कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीत फार फरक असतो. त्यामुळेच तुम्ही हिसकावून घेतलेले चिन्ह सुद्धा तुमचे 12 वाजायला 10 मिनिटं शिल्लक आहे हेच दाखवते आहे, असे ट्विट एनसीपीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे. त्यामुळे, या फोटोवरुनही अजित पवारांना लक्ष्य करण्याची संधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाते नेते आणि पदाधिकारी साधत असल्याचे दिसून येते.
दोन्ही गट नेहमीच आमनेसामने?
कधी जाहीर सभांमधून, कधी बैठकांमधून, कधी पत्रकार परिषदांमधून तर कधी सोशल मीडियातून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आताविधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्ष एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकांपूर्वी फुट पडलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेच एकमेकांविरुद्ध अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गुलाबी रंगाच्या जॅकेटवरुन टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गुलाबी रंगांच्या जॅकेटमुळे आणि डीपीडीसी बैठकीमुळे राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आहेत. पुण्यातील बैठकीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट शाब्दिक चकमक झाल्याची पाहायला मिळाली. त्यानंतर, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला. तर अजित पवारांनी आज पिंपरीतील मेळाव्यातून त्यांनाही प्रत्युत्तर दिले.
Join Our WhatsApp Community