Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पात देशासह महाराष्ट्रासाठी काय असणार?

178
Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पात देशासह महाराष्ट्रासाठी काय असणार?
Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पात देशासह महाराष्ट्रासाठी काय असणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2024) मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सकाळी ११ वाजता संसदेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पात देशासह महाराष्ट्रासाठी काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नवीन पेन्शन प्रणाली आणि आयुष्मान भारत यांसारख्या सामाजिक सुरक्षेशी संबंधित योजनांबाबत अर्थसंकल्पात काही घोषणा होण्याची शक्यता आहे. तर, प्राप्तीकराच्या बाबतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा काही जण व्यक्त करत आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता वाढली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प सादर करताना माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम मागे टाकत इतिहास रचणार आहेत. दिवंगत माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सलग सहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला होता. हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय सुविधा किंवा खुशखबर असतील याची उत्सुकता लागली आहे. (Budget 2024)

…या विषयावर जास्तीत जास्त भर देण्याची शक्यता 

या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती पायाभूत सुविधा, महिला कल्याण, गृहिणींना उत्पादन क्षेत्र तसंच ग्रामीण विकास, नवीन प्राप्तिकर प्रणाली, व्यवसायिकांसाठी सुलभ जीएसटी तरतूद, बांधकाम क्षेत्रासाठी विशेष धोरण, कर्ज संरचना, या विषयावर सुद्धा जास्तीत जास्त भर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारताची आहे. येणाऱ्या काही वर्षात ती तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ही सात टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. २०४७ पर्यंत मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला विकसित भारतामध्ये रुपांतरित करण्यासाठी तसेच देशाला मजबूत विकास मार्गावर नेण्याच्या अनुषंगानं हा अर्थसंकल्प असेल. (Budget 2024)

अर्थसंकल्पातून राज्यातील विविध योजनांची हमी केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा – अर्थतज्ञ विश्वास उटगी

अर्थसंकल्पाविषयी बोलताना अर्थतज्ञ विश्वास उटगी म्हणाले, राज्यात जनतेला आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारनं ज्या काही योजना आणल्या आहेत. त्या योजना पूर्णपणे अपयशी होणार असून यासाठी सरकारी तिजोरीत खडखडाट असताना लोकांना त्या योजनेचे पैसे कुठून देणार हा प्रश्न आहे. अशातच उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना महाराष्ट्रातील विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुका नजरेसमोर ठेवून महाराष्ट्रावर मेहरबानी केली जाऊ शकते. महाराष्ट्र राज्य हे केंद्रासाठी फार महत्त्वाचं राज्य आहे. लोकसभेत झालेला पराभव हा दिल्लीच्या जिव्हारी लागला असून त्या पराभवाचा वचपा भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडला भाऊ, लाडका विद्यार्थी, तीर्थक्षेत्र अशा विविध योजनांचा पाऊस राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महायुतीनं पाडल्यानंतर आता केंद्र सरकार महाराष्ट्रात विविध योजनेच्या अनुषंगानं मुसळधार पाऊस पाडू शकतो. राज्य सरकारने घोषित केलेल्या योजनांचा पैसा जनतेच्या हातात पडेल, याची हमी केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा जरी हा पहिला अर्थसंकल्प असला तरी महाराष्ट्रासारख्या राज्याच्या दृष्टिकोनातून तो अतिशय महत्त्वाचा अर्थसंकल्प असणार आहे. (Budget 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.