भुलेश्वर येथून एका व्यापाऱ्याचे भागीदाराने अपहरण करून पुण्यातील कोंडवा येथे एका खोलीत डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी १२ तासांत या व्यापाऱ्याची पुण्यातून सुटका करून तीन जणांना अटक केली आहे. व्यवसायिक वादातून अपहरण करण्यात आले होते अशी माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली आहे. (Kidnapping)
हेमंतकुमार रावल असे अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कापुरराम घांची, प्रकाश पवार गणेश पात्रा असे अटक करण्यात आलेल्या तीन अपहरणकर्त्यांची नावे असून इतर तिघांचा कसून शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंतकुमार आणि कापुरराम घांची हे दोघे टेक्सटाईल व्यवसायात भागीदार होते, घांची हा अहमदाबाद येथून कपड्यांचा माल खरेदी करून पुण्यात हेमंतकुमारला पाठवत होता, हेमंतकुमार हा पुण्यात व्यवसाय करीत होता. काही कारणास्तव दोघांची व्यवसायिक भागीदारी संपली व घांची याने हेमंतकुमारकडे निघणारे ३० लाख रुपये मागितले असता हेमंतकुमार हा टाळाटाळ करू लागला. घांचीने हेमंतकुमारचे अपहरण करून पैसे वसूल करण्याचा बेत आखला होता. (Kidnapping)
(हेही वाचा – Pune Dog Thief : पुण्यात चोराने चक्क पळवला कुत्रा)
घांचीने या कामासाठी आणखी पाच जणांना तयार केले. शनिवारी हेमंतकुमार हा भुलेश्वर येथे कामानिमित्त आला होता, त्यानंतर हेमंतकुमार आणि त्याचा एक साथीदार असे दोघेजण शनिवारी रात्री मद्यपान करून हॉटेल बाहेर आले असता दबा धरून बसलेल्या घांची आणि इतरांनी हेमंतकुमार याला मारहाण करून मोटारीत कोंबून थेट पुणे गाठले. हेमंतकुमारचे अपहरण करण्यात आल्यामुळे त्याचा सहकारी घाबरला आणि त्याने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर फोन केला. लोटी मार्ग पोलिसांनी तात्काळ एक पथक अपहरणकर्त्याच्या मागावर पाठवले, पोलीस पथकाने पुण्यातील कोंडवा येथून एका घरातून हेमंतकुमार याची सुटका करून घांची सह तीन जणांना अटक केली आहे. (Kidnapping)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community