Parliament Session : महाविकास आघाडीची एकजुटता फक्त दिखावा? संसदेत फुटला फुगा

226
Parliament Session : महाविकास आघाडीची एकजुटता फक्त दिखावा? संसदेत फुटला फुगा
  • वंदना बर्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा विरोध करण्यासाठी अस्तित्वात आलेली इंडी आघाडी एकजुटता दाखविण्याचा प्रयत्न करीत असली तरी; महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये लाव्हा खदखदतो आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी मंगळवारी अर्थसंकल्पाच्या विरोधात संसदेत घोषणाबाजी केली. मात्र, यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) ची उपस्थिती नगण्य होती. (Parliament Session)

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणे आहे. अशात, महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांतील एकजुटतेचे सत्य पुन्हा एकदा पुढे आले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांत काहीतरी बिनसले असून आतल्याआत लाव्हा खदखदत असल्याचे नुकतेच दिसून आले आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या तृतीय सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप करीत महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या आवारात केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. (Parliament Session)

संसदेतील गरुड या मुख्य दाराजवळ महाविकास आघाडीचे खासदार अर्थसंकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यासाठी जमले होते. मात्र, तिन्ही पक्षांमध्ये एकजुटता नसल्याचे यावेळी दिसून आले. बजेटला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव, बळवंत वानखेडे, श्याम बर्वे, कल्याण काळे, शिवाजी कळगे, राकॉंचे अमर काळे, अपक्ष खासदार विशाल पाटील, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाऊसाहेब वाकचौरे आदी खासदार जमले होते. (Parliament Session)

(हेही वाचा – मी या कोर्टाचा इनचार्ज आहे; CJI Chandrachud आणि वकील यांच्यात भर सुनावणीत खडाजंगी)

महाविकास आघाडी किती एकजूट? 

मात्र, यावेळी असे दिसून आले की, कॉंग्रेसने दोन्ही पक्षांच्या खासदारांशी चर्चा न करता किंवा संपर्क न साधता बजेटच्या विरोधात घोषणाबाजी करण्याचा निर्णय घेतला. वर्षा गायकवाड कॉंग्रेसच्या खासदारांसोबत बाहेर आल्या आणि घोषणाबाजी करायला सुरुवात केली. प्रियंका चतुर्वेदी आधीपासूनच संसदेच्या आवारात बजेटवर आपली प्रतिक्रिया देत होत्या. घोषणाबाजीचा आवाज ऐकून प्रियंका चतुर्वेदी सामील झाल्या. शिवसेनेचे (उबाठा) लोकसभेत ९ खासदार आहेत. मात्र, नउपैकी एकही खासदार या घोषणाबाजीत दिसून आला नाही. चतुर्वेदी या राज्यसभेच्या खासदार आहेत. याशिवाय, लोकसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) आठ खासदार आहेत. यातील अमर काळे यांना सोडले तर उर्वरित सात खासदार यावेळी गैरहजर होते. जेव्हा की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अन्य खासदार संसदेच्या आवारात फिरत होते. (Parliament Session)

यामुळे, महाविकास आघाडीतील घटक पक्ष खरंच एकजूट आहेत काय? की महाविकास आघाडी फक्त एकजुटतेचा दिखावा करीत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी, लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरवितानाही एकजुटतेचा फुगा फुटला होता. मित्र पक्षांना विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सांगलीचा उमेदवार जाहीर केला होता. अशात, कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी पक्षाशी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडून आले. महाविकास आघाडी किती एकजूट आहे? ही बाब यावरून सिद्ध झाली होती. (Parliament Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.