दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत मुंबईतील सुमारे ४० ते ८० टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतून मुंबईत ही योजना राबविण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत सुमारे ६० हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी दरवर्षी १११.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यात मंजूर केलेल्या या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यास जुलै महिना उजाडावा लागला असून मुख्यमंत्री आपली बहिण योजनेआधी याला मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात बहिणींनंतर दिव्यांगांच्या हाती मदत पडणार आहे. त्यामुळे दिव्यांगांनी आता त्वरीत यासाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. (UDID Card)
मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संकल्पनेनुसार दिव्यांगांना आर्थिक मदत करण्यासाठी योजना हाती घेण्याची सुचना केली. त्यानुसार चहल यांनी महापालिकेच्या चालू अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद करून या योजनेची घोषणा केली. त्यामुळे विद्ममान महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ही योजना लागू करण्यात येत आहे. फेब्रवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्पात याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात नियोजन विभागाच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या या प्रस्तावाला प्रशासकांनी मंजुरी दिली होती. त्यामुळे ही योजना १ एप्रिल २०२४ पासून लागू होईल असे बोलले जात होते, पण पुढे मराठा आरक्षण सर्वे, निवडणूक आचारसंहिता आदींचे अडथळे आल्यामुळे याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. (UDID Card)
(हेही वाचा – महाविकास आघाडी सरकारला आरक्षण टिकवता आले नाही; मंत्री Shambhuraj Desai यांची टीका)
या दिव्यांग बांधवांना मिळणार मासिक १ हजार
या योजने अंतर्गत वय वर्ष १८ वरील ४० टक्के दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक १२ हजार रुपये मिळतील. (UDID Card)
या दिव्यांगांना मिळणार मासिक ३ हजार
तसेच ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित १८ हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक ३६ हजार रुपये मिळतील. या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) असणे आवश्यक आहे.
दिव्यांग बांधवांनी असा करावा अर्ज
या योजने अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवाशी असलेल्या दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी पात्रतेचे निकष, योजनेच्या अर्टी, शर्ती, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in येथे About BMC – Departments – Department Manuals-Assistant Commissioner Planning-Docs- दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (सन २०२४-२५ ते सन २०२८-२९)’ यावर क्लिक केल्यास तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल. या योजनेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज सर्व संबंधित विभाग कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. (UDID Card)
दिव्यांगांच्या तीव्रतेवर अशाप्रकारे दिले जाते युआयएडी कार्ड
- सफेद कार्ड : दिव्यांगत्व हे ४० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर
- पिवळे कार्ड : दिव्यांगत्व हे ४० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर
- निळे कार्ड : दिव्यांगत्व हे ८० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर
कोणत्या दिव्यांगांना कसे मिळणार अर्थसहाय्य
- कार्डचा प्रकार : पिवळे कार्डधारक
- दिव्यांगाची टक्केवारी : ४० ते ८० टक्के
- दिव्यांगाची युडीआयडी कार्डधारकांची संख्या : ४२,०७८
- अर्थसहाय्य : प्रत्येक सहा महिन्यांनी ६,००० रुपये, म्हणजे वर्षाला १२ हजार रुपये
कार्डचा प्रकार : निळे कार्डधारक
- दिव्यांगाची टक्केवारी : ८० टक्क्यांवरील
- दिव्यांगाची युडीआयडी कार्डधारकांची संख्या : १७,०३७
- अर्थसहाय्य : प्रत्येक सहा महिन्यांनी १२,००० रुपये, म्हणजे वर्षाला ३६ हजार रुपये (UDID Card)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community