पुण्यात 25 जुलैच्या रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. तर कोल्हापूरातही पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी धोकापातळीच्या जवळ पोहोचली आहे. पुण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (Pune Rains)
(हेही वाचा – Hindustan Post Impact : गोल देऊळासमोरील मलवाहिनीची तातडीने महापालिकेने केली सफाई, वाहत्या मल मिश्रित पाण्याचा प्रवाह थांबला)
खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक्स विसर्ग
हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स होता. तो आता ४० हजार क्यूसेक्स करण्यात येत आहे. सेच धरण परिसरात 100 mm व घाटमाथ्यावर 200 mm पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे . गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, होळकर पूल परिसर, कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे. या पावसामुळे पुणे शहरातील मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
जिल्ह्यातही सर्वत्र पाऊस
उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्याच्या सर्वच भागात रात्री पासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यासोबतच हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आज खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्याच्या पश्चिम घाट माथ्यावरील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. डिंभे धरण परिसरात १०४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. (Pune Rain Update)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (DYCM Ajit Pawar) यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community