मराठा समाजाला आरक्षण मिळायचे असेल, तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे घटना दुरुस्ती करावी लागले. हा विषय केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यात येतो. त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर शक्य आहे, असे मत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.
न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करावा!
कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी, १४ जून रोजी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी छत्रपती मालोजीराजे, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, तो मान्य करावा लागणार आहे. मात्र आता पुढे काय हा प्रश्न आहे. त्यामुळे या निर्णयाचे मराठीत व्यवस्थित भाषांतर करावे, त्यातून न्यायालयाचा अवमान होणार नाही याचीही काळजी घेण्यात घ्यावी आणि न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करावा, असेही छत्रपती शाहू महाराज म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आमचे कायम मार्गदर्शन असेलच, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा : भेटी-गाठीचे राजकारण)
मराठा समाजाने स्वतः सक्षम व्हावे!
मराठा समाजाने आता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची वेळ आली आहे. स्वतः सक्षम बनवावे आणि त्यामाध्यमातून स्वतःला सामर्थ्यवान बनवावे, असेही छत्रपती शाहू महाराज म्हणाले. मराठा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. त्यासाठी आता सरकारने समाजाच्या हितासाठी योग्य प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी काय करायचे हे सर्वांना सर्व माहित आहे. त्यामुळे नव्याने यात काही सांगण्यासारखे राहिले नाही, असेही छत्रपती शाहू महाराज म्हणाले.
चर्चेला उधाण!
एका बाजूला खासदार संभाजी महाराज हे राज्यभर दौरे करून मराठा समाजाला आरक्षाणाच्या मुद्यावरून संघटित करत आहे. त्यामाध्यमातून आंदोलन उभे करण्याची रणनीती आखत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन चर्चेला उधाण आणले आहे.
Join Our WhatsApp Community