श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने ‘जागर शिवराज्याभिषेकाचा सन्मान शिवसमिधांचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवराज्याभिषेक समितीच्या सर्व सदस्यांचा सन्मान २८ जुलै रोजी करण्यात आला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब (Appa Parab) यांचा शिवसन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.
(हेही वाचा – Award Ceremony : हिंदुस्थान पोस्टचे संपादक स्वप्निल सावरकर यांचा मराठा तलवार देऊन विशेष सन्मान)
या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ नाणीसंकलक अशोकसिंह ठाकूर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, बडोदा संस्थानचे वंशज डॉ. हेमंत राजे गायकवाड, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नात असीलता राजे, तसेच श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार हे मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
३५ पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन करणारे आप्पा परब
आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांच्या पदाधिकाऱ्यांनीही या वेळी आप्पा परब यांचा सत्कार केला. ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब म्हणजेच बाळकृष्ण सदाशिव परब यांनी इतिहासातील विविध विषयांवर ३५ पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक कार्यासाठी विविध सामाजिक आणि शासकीय पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. यासोबतच रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा यशस्वी करण्यासाठी कष्ट घेणाऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पुस्तक प्रकाशन
या कार्यक्रमात आप्पा परब यांच्या ‘शिवराजाभिषेक’ या पुस्तकाचे, डॉ. हेमंत राजे गायकवाड यांच्या ‘द ग्रेट शिवाजी फादर ऑफ नेव्ही’ या पुस्तकाचे, तर श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव (Shivrajyabhishek Ceremony) सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या ‘इतिहासमंथन’ या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
असा झाला कार्यक्रम
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे सदस्य वेदांत अडके आणि स्नेहल शिंदे यांनी शिवबावनीमधील काही छंद सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर मुद्रा मंगेश दामले या बालिकेने शिवपूर्व ते शिवराज्याभिषेक या विषयावर व्याख्यान केले. अनेक शिवप्रेमींनी त्यांची कला या वेळी सादर केली. समितीचे सदस्य श्री. आणि सौ. विश्वास मेस्त्री यांनी वाघ्या मुरळी नृत्य सादर केले. सोलापूर येथील अक्षय तळेकर यांच्या पथकाने रोमहर्षक स्वराज्य मर्दानी खेळ सादर केले. कुर्ला वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीर प्रवीण फणसे यांच्या कुटुंबानेही या वेळी शाहिरी केली. कांदिवली, गोराई येथील ‘आम्ही मावळे’ या संघाने ढोल-ताशा वादनाच्या माध्यमातून शिववंदना सादर केली. कार्यक्रमात समितीच्या वतीने साजऱ्या करण्यात आलेल्या 351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची चित्रफीत दाखवण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community