- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
मरोळच्या आर्या गोल्ड कंपनीने व्यवस्थापकाच्या रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करताना, त्यात ‘नॉन महाराष्ट्रीयन’ (Non Maharashtrian) ही ठळक अट ठेवल्याने राजकीय वातावरण तापले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेण्यासाठी सरसावला आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे पुढारी आणि विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. ते निषेध व्यक्त करेपर्यंत थांबले नाहीत तर त्यांनी आश्चर्यकारक विधान केले आहे. वडेट्टीवार म्हणाले, ‘ज्या मुंबईसाठी आपल्या १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नागरिकांचीच गळचेपी होत असल्याचे दिसून आले आहे.’
माझ्या मते त्यांनी १०५ हुतात्म्यांचा उल्लेख केला. कारण कदाचित त्यांना इतिहास माहित नसावा किंवा राजकारणापोटी इतिहासाचा विसर पडत असावा. ज्या १०५ हुतात्म्यांचा उल्लेख वडेट्टीवार करतात, त्यांचा खून कोणी केला? कोणाच्या आदेशावरून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या? त्यावेळी कोणाचे सरकार होते? याचा अभ्यास वडेट्टीवार यांनी करण्याची नितांत गरज आहे आणि ज्या पक्षाने १०५ मराठी माणसांची हत्या केली, त्या पक्षाने मराठी माणसाची माफी मागितली आहे का? वडेट्टीवार यांनी अभ्यास करुन पाहावा, त्या पक्षाचे नाव कॉंग्रेस तर नाही ना? राहुल गांधी त्या पक्षाचे सर्वोच्च नेता आहेत, ते महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात तेव्हा वडेट्टीवार यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? नसेल दिली, तर त्यांनी उगाच मराठी माणसाचा कळवळा असण्याचा अभिनय करु नये.
(हेही वाचा – Maratha Reservation वरील विरोधकांच्या खोट्या नेरेटिव्हचा सोमवारी पर्दाफाश करणार; Pravin Darekar यांचा इशारा)
दुसरी गोष्ट इतर पक्ष देखील आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढच्या वेळी चूक झाली तर आमच्या पक्षाच्या स्टाईलने उत्तर देऊ. म्हणजे काय तर फटके देऊ, तोडफोड करु असेच ना? पण मराठी माणसांनी यांच्या भावनिक आवाहनाला बळी पडू नये. हे तेच लोक आहेत, जे बाहेर अदानी-अंबानींना दूषणे देतात आणि त्यांच्याच लग्नात पुढे पुढे करतात. हे तेच लोक आहेत, जे मराठी मराठी म्हणून बोंबलतात आणि आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. या लोकांनी मराठी माणसाच्या उन्नतीसाठी काय केले आहे? उलट मराठी माणसाच्या नावाने राजकारण करून यांचीच उन्नती झाली आहे. त्यामुळे अशा राजकीय पक्षांकडे दुर्लक्ष करुन आपल्याला या प्रकरणाकडे पाहावे लागणार आहे.
एक गोष्ट खरी की, जरी कंपनीच्या मालकांनी मराठीत माफी मागितली असली, तरी ही चूक नव्हे, तर मुद्दामून केलेले कृत्य असल्यामुळे हा गुन्हाच आहे. मराठी माणसाचा प्रत्यक्षपणे अपमान केल्यामुळे सरकारने या प्रकरणाकडे लक्ष घालायला हवे. किमान गुन्हा तरी नोंदवून घ्यायला हवा, जेणेकरून भविष्यात असा गुन्हा कोणी करण्याची हिंमत करणार नाही. दुसरी गोष्ट अशा प्रकरणांच्या बाबतीत मराठी माणसाने ‘आंदोलन’ किंवा ‘फटके’ हे तंत्र न वापरता ‘हटके’ हे तंत्र वापरले पाहिजे. म्हणजे काय? तर हातात दगड घेऊन या गोष्टीचा निषेध करण्यापेक्षा हातात उद्योजकीय उपकरणे घेऊन या गोष्टीचा निषेध करायला हवा. अर्थात शाब्दिक संताप व्यक्त करायलाच हवा. एखादी कृती आवडली नाही तर त्या कृतीचा लगेच निषेध व्हायलाच हवा. पण हा एक भाग झाला, आता दुसरा भाग असा की, तीव्र संताप किंवा निषेध व्यक्त केल्यानंतर आपण या विरोधात काही कठोर पावले उचलणार आहोत की नाही? ही कठोर पावले मराठी माणसाच्या उन्नतीची असावीत. आज ते लोक नॉन-महाराष्ट्रीयन अशी जाहिरात प्रसिद्ध करत आहेत, उद्या त्याच लोकांनी ओनली महाराष्ट्रीयन अशी जाहिरात लावायला हवी, अशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे.
(हेही वाचा – Share Market Fraud : शेअर बाजाराच्या नादात व्हॉटस्अपच्या ग्रुपमध्ये अॅड केले अन् ३४.६२ लाख रुपयांना फसवले)
पुढील २५ वर्षे मराठी माणसाने फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या उन्नतीचा विचार केला पाहिजे. आरक्षण, जातीयवाद, पक्षीय भांडण, प्रांतवाद या वादात न पडता मराठी माणसाने कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे. उद्योजकीय मानसिकता विकसित व्हायला पाहिजे. एखादे अमराठी उद्योजकीय कुटुंब असते, त्यांच्या घरातही उद्योगाच्या चर्चा होतात; म्हणूनच एखादा विशिष्ट समाज उद्योजकीय समाज म्हणून पुढे येतो. अशा प्रकारे आपण या ‘नॉन महाराष्ट्रीय’ (Non Maharashtrian) प्रकरणाला सडेतोड उत्तर देऊ शकतो. १९६० पासून मराठी माणसाने आपला संताप व्यक्त करण्यासाठी ‘फटके’ या तंत्राचा अवलंब केला होता. त्यामुळे आपले नुकसानच झालेले आहे. आता ‘हटके’ या तंत्राचा वापर करूया आणि मराठी पताका आसमंतात फडकवूया…
हेही पहा –
Join Our WhatsApp Community