इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, १८ वर्षांखालील मुलांना बालक म्हणता येते तर इतर काही संस्था १४ वर्षांखालील मुलांना बालक म्हणतात. नेमके बालक कोणाला म्हणायचे, या व्याख्येत असलेल्या गोंधळाचा फायदा आज अनेक गुन्हेगार घेतात, भ्रष्टाचार करीत अनेकदा अनेक जण या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी झटतात. पुण्यातील पोर्श कार अपघात आणि पूजा खेडकर प्रकरणामध्ये आपण हा भ्रष्टाचार पाहिला आहे, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष, माजी पोलीस महासंचालक डॉ. प्रवीण दीक्षित (Praveen Dixit) यांनी वास्तव मांडले.
पुण्यातील हिंदू महिला सभेच्या वतीने टिळक रस्त्यावरील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दीक्षित बोलत होते. कार्यक्रमात हिंदू महिला सभेच्या वतीने आणि डॉ. प्रवीण दीक्षित (Praveen Dixit) यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे यांचा कै. लीलावती फळणीकर स्मृती प्रित्यर्थ सजग पुरस्कार देऊन, तर सर्पमित्र नीता गजरे-कुसळ यांना साहस पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले, आपलं घर या संस्थेचे विजय फळणीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चांगल्या घरातील मुले गुन्हेगार
ज्या मुलांना आई-वडील नाहीत, जी मुले उघड्यावर मोठी होतात, ती मुले पुढे जाऊन गुन्हेगार होतात हा आपल्या समाजातील समज पूर्णपणे चुकीचा आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणात चांगल्या घरातील, पैसेवाली आणि उच्चशिक्षित आई-वडील असलेली मुले ही आज अनेक गुन्ह्यांमध्ये अपराधी असल्याचे दिसून आले आहे. आज चांगल्या घरातील, पैसे असलेली आणि उच्च शिक्षित आई-वडील असलेली मुले ही अंगावर काटा येईल असे हिनकस गुन्हे करण्यात अग्रेसर आहेत. माझ्या मते या परिस्थितीला ती मुले नाहीत तर त्यांचे पालक जबाबदार आहेत. या मुलांना गुन्ह्यांपासून परावृत्त कसे करायचे आणि सक्षम कसे करायचे यावर काम करावे लागणार आहे, असेही डॉ. दीक्षित (Praveen Dixit) म्हणाले.
आज लहान मुलांना पालकांनी वेळ देण्याची, मायेची ऊब देण्याची गरज आहे असे सांगत डॉ अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, आपल्या आजूबाजूच्या समाजाचा विकास करायचा असेल तर केवळ रस्ते, वीज आणून तो विकास होणार नाही. माणसांचा विकास होतोय का हे जास्त महत्त्वाचे आहे. लहान मुले आणि महिलांसाठी पोलीस स्थानकात विशेष कक्ष व बालस्नेही अधिकारी असायला हवेत असे नियम असले तरी ते कागदावरच आहेत. विशेषतः बालगुन्हेगारांबद्दल संवेदनशीलता आज प्रशासनात दिसून येत नाही हे प्रकर्षाने जाणवते. लहान मुलांमध्ये लैंगिक शोषण, पॉर्नचे वाढते व्यसन या बाबींकडे आपण लक्ष देऊन त्याबद्दल जागृती करायला हवी आहे.
Join Our WhatsApp Community