- सचिन धानजी,मुंबई
मुंबईच्या रस्त्यांवर यंदा कधी नव्हे तेवढे खड्डे (Potholes) पडल्याचे दिसून येत असून हे खड्डे बुजवले जात नसल्याने तीव्र आरोप होत आहे. तसेच यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचण्याचीही ठिकाणेही नवीन निर्माण झाली आहे. मात्र, यामुळे महापालिका प्रशासन टार्गेट होत असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही खात्यांचे प्रमुख अभियंताच नवखे असल्याने तसेच त्यांनी या विभागांमध्ये कधीच काम केले नसल्याने याचा परिणाम हा यंदाच्या पावसाळ्यात दिसून येत आहे. एखाद्या अधिकाऱ्याला पदोन्नतीचा लाभ देतानाच त्या संबंधित विभागाचा अनुभव आहे का याची माहिती न घेता त्यांना प्रमुख अभियंता पदाचा भार सोपवणे हेच महापालिकेला आता भारी पडताना दिसत आहे. (Potholes)
रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता मनिषकुमार पटेल हे १ जुलै २०२४ रोजी सेवा निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागी कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम यांच्याकडे रस्ते विभागाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे निकम यांच्याकडे रस्ते विभागाच्या प्रमुख अभियंता पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निकम यांनी यापूर्वी कधीही रस्ते विभागात काम केलेले नसून थेट प्रमुख अभियंता म्हणून ऐन पावसाळ्यातच त्यांच्याकडे रस्ते विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे आधीच मुंबईतील रस्ते विभागाची भौगोलिक परिस्थिती निकम यांना माहित नाही अणि त्यातच ऐन पावसाळ्यात त्यांच्याकडे रस्ते विभागाची जबाबदारी सोपवल्याने खालच्या अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या माहितीवरच ते अवलंबून आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात रस्त्यांवर कसे काम चालले आहे किंवा कंत्राटदारांकडून कसे काम करून घ्यायचे याचा आपत्कालीन कालातील अनुभव नसल्याने निकम यांचे नेतृत्व अनुभवाने कमी पडत असून त्यांना थेट पावसाळ्यातच रस्ते विभागाची जबाबदारी सोपवून एकप्रकारे प्रशासनाने तोफेच्या तोंडी चढवले आहे. महापालिका प्रशासनाला अशाप्रसंगी मलनि:सारण विभागाचे प्रमुख अभियंता शशांक भोरे यांच्याकडे रस्ते प्रमुख अभियंता विभागाचा भार सोपवता आला असता. भोरे हे रस्ते विभागात नियोजन विभागात कार्यरत असल्याने प्रत्येक रस्त्यांचा विकास आणि खड्ड्यांच्या कामांची त्यांना माहिती होती. त्यामुळे भोरे यांना रस्ते विभागाचा भार पेलता आला असता. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पाच हजारांहून अधिक खड्डे निर्माण होणे आणि ते खड्डे (Potholes) नियोजित वेळेत न बुजवले गेल्याने महापालिकेला आणि पर्यायाने रस्ते प्रमुख अभियंता निकम यांना टिकेचे धनी व्हावे लागले. त्यातच नियोजित वेळेत खड्डे न भरल्याने काही रस्ते अभियंत्यांना मेमो दिल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परंतु या रस्ते अभियंत्यांची बाजू प्रमुख अभियंता म्हणून निकम हे मांडू न शकल्याने विभागांतच ही नाराजी अधिक पसरली गेली आहे, त्याचा परिणाम खड्ड्यांच्या वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे. (Potholes)
(हेही वाचा – Hawkers Policy : फेरीवाल्यांच्या नगरपथ विक्रेता समितीवरील सदस्य निवडीकरता २९ ऑगस्ट रोजी निवडणूक)
तसेच यंदाच्या पावसाळ्यात हिंदमाता, माटुंगा गांधी मार्केटसह इतर सब वे आणि भांडुप, कांजूर मार्ग चेंबूर, मालाड, मानखुर्द, गोवंडी, सांताक्रुझ आदी भागांमध्ये पाणी तुंबले गेले. तर पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता श्रीधर चौधरी यांची १ मार्च २०२४ रोजी नियुक्ती केली गेली. विशेष म्हणजे श्रीधर चौधरी यांचा जलअभियंता विभागातील अनुभव दांडगा असला तरी पर्जन्य जलवाहिनी विभागातील त्यांचा अनुभव हा पाच महिन्यांचा आहे. मुंबईतील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता चौधरी यांना या विभागाचा अनुभव नसल्याने थेट पावसाळ्याच्या तोंडावरच त्यांच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपवल्याने सध्या चौधरी आणि त्यांचे खाते टार्गेट होत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी साचणाऱ्या ठिकाणांचा अभ्यास करून त्याठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते, परंतु या खात्याचे प्रमुख अभियंता यांना या खात्याचे ज्ञान नसल्याने हाताखालील अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवरच ते अवलंबून असतात. परिणामी, पावसाळ्यात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याबाबत उत्तर देताना त्यांना यापूर्वीची आपली माहिती चुकीची असल्याची उपरतीही झाली आहे. त्यामुळे निकम आणि चौधरी हे आपल्या कर्तव्यात सर्वांत प्रामाणिक अधिकारी असले तरी ऐन पावसाळ्यात त्यांना अनुभव नसलेल्या विभागांची जबाबदारी सोपवून एकप्रकारे प्रशासनाने तोफेच्या तोंडीच उभे केल्याचे दिसून येत आहे. त्यातचही विशेष म्हणजे आयुक्त व प्रशासक डॉ. भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर हेही मुंबईत नवखे असताना त्यांच्या हाताशी असलेले रस्ते व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंताही या विभागात अननुभवी असल्याने मुंबईत सध्या खड्डे (Potholes) आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्यांमुळे महापालिकेला टिकेला सामोरे जावे लागत आहे. (Potholes)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community