Rohan Bopanna : पॅरिसमधील अपयशानंतर रोहन बोपान्नाची राष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती

भारतीय जर्सीमधील हा शेवटचा सामना होता, असं बोपान्नाने म्हटलं आहे.

132
US Open 2025 : युएस ओपन टेनिस स्पर्धेत रोहन बोपान्नाचा मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत पराभव
  • ऋजुता लुकतुके

रोहन बोपान्नाने (Rohan Bopanna) राष्ट्रीय टेनिसमधून ४४ व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे. बोपान्ना आणि त्याची दुहेरीतील साथीदार श्रीराम बालाजी यांचा दुहेरीतील पहिल्याच फेरीत फ्रेंच जोडी मॉनफिल्स आणि व्हॅसेलिन यांच्याकडून पराभव झाला. रविवारी झालेल्या या पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी बोपान्नाने भारतीय जर्सीमधील हा शेवटचा सामना होता, असं जाहीर केलं आहे. डेव्हिस चषकातून बोपान्नाने आधीच निवृत्ती जाहीर केली होती. आता ऑलिम्पिकमधील पराभवानंतर बोपान्नाचा २२ वर्षांचा भारतीय राष्ट्रीय संघातील प्रवास थांबला आहे.

लिअँडर पेसने १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर भारतीय टेनिसपटूने एकही ऑलिम्पिक पदक पटकावलेलं नाही. पेस नंतर एकेरीत नाही पण, दुहेरीत रोहन बोपान्ना (Rohan Bopanna) पदकाच्या सगळ्यात जवळ गेला होता. २०१६ मध्ये सानिया मिर्झाच्या साथीने त्याने उपान्त्य फेरीत धडक दिली होती. पण, कांस्य पदकाच्या लढतीत दोघांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे दोघांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं.

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : मनू व सरबज्योत यांची कांस्य पदकाची लढत आणि मंगळवारचं भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक)

यंदा ऑलिम्पिकच्या सुरुवातीला बोपान्नाने, ४४ व्या वर्षी आपण ऑलिम्पिक पदक जिंकू शकतो, असा आशावाद व्यक्त केला होता. पण, आता ते स्वप्नच राहणार आहे. निवृत्ती जाहीर करताना बोपान्ना शांत आणि धीरगंभीर होता. ‘देशासाठी खेळलेली ही शेवटची स्पर्धा होती. मी कुठल्या वळणावर उभा आहे याची मला जाणीव आहे. आता मला फक्त समाधानासाठी खेळायचं आहे. जोपर्यंत मजा येईल, स्पर्धा करू शकेन, तोपर्यंत टेनिस सर्किट खेळत राहायचं एवढंच मी ठरवलं आहे,’ असं बोपान्ना पराभवानंतर बोलताना म्हणाला.

डेव्हिस चषकातून बोपान्नाने गेल्यावर्षीच निवृत्ती जाहीर केली होती. आता २०२६ च्या आशियाई क्रीडास्पर्धेत खेळणार नसल्याचंच त्याने स्पष्ट केलं आहे. बोपान्ना देशातील दुहेरीतील खेळाडूंना मार्गदर्शन करतो. आणि भविष्यात भारतीय टेनिस फेडरेशनबरोबर काम करण्यासही उत्सुक असल्याचं त्याने म्हटलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.