राज्यातील आगामी विधानसभा आणि मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपात खांदेपालट करण्यात येणार असून त्यादृष्टीकोनातून मुंबई भाजपाकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान भाजपाचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांचे लक्ष आता क्रिकेटकडेच अधिक असल्याने, तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांना दिलेली जबाबदारीही निट पार पाडता न आल्याने त्यांच्या जागी मुंबई भाजपा अध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याची निवड केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. (BJP)
मुंबई भाजपाचे अध्यक्षपदी असलेल्या आमदार मंगलप्रभात लोढा यांना बाजूला करून त्यांच्या जागी मागील १२ ऑगस्ट २०२२ रोजी आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काही काळ शांत राहिल्यानंतर शेलार यांनी पुन्हा आपल्या शैलीत पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेलार यांच्याकडून तेवढ्या प्रभावीपणे पक्षाची बांधणी केली जात नव्हती. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेलार हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष असले तरी संपूर्ण मुंबईत ते कुठेच दिसले नाही. पक्षाने त्यांच्याकडे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे ते याच मतदारसंघात अडकून बसले. परंतु त्यांना स्वत:च्या विधानसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना अधिकची आघाडी मिळवून देता आली नाही. (BJP)
मात्र, दुसरीकडे काँग्रसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्वत:चा मतदार संघ सोडून उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवली आणि त्या निवडूनही आल्या. त्यामुळे भाजपाचा मुंबई अध्यक्षाकडे या मतदारसंघाची जबाबदारी सोपवूनही शेलार यांना ही कामगिरी पार पाडता न आल्याने पक्षातील श्रेष्ठींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यातच शेलार हे बीसीसीआयचे खजिनदार असल्याने त्यांच्यावर वावर मुंबईच्या बाहेरच अधिक आहे. त्यामुळे शेलार यांचा क्रिकेटकडेच अधिक असल्याने मुंबईतील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्याचा परिणाम लोकसभा मतदार संघात दिसून आला. त्यामुळे शेलार यांना मुंबईतील पक्षाच्या राजकारणात अधिक स्वारस्य नसल्याने मुंबईची जबाबदारी आता नवीन उमद्या आणि सर्वांशी चांगला जनसंपर्क असलेल्या पदाधिकाऱ्याच्या हाती सोपवण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदासाठी प्रसाद लाड हे आग्रही असले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कडवट कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रसाद लाड यांच्यासमवेत प्रविण दरेकर, अतुल भातखळकर, अमित साटम, पराग अळवणी, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणारी व्यक्तीच मुंबई अध्यक्षपदी असावा याकरता सर्वांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याचे बोलले जात आहे. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community