Wayanad landslides : मृतांची संख्या आतापर्यंत 123; केरळची स्थिती का झाली नाजूक ?

190
Wayanad landslides : मृतांची संख्या आतापर्यंत 123; केरळची स्थिती का झाली नाजूक ?
Wayanad landslides : मृतांची संख्या आतापर्यंत 123; केरळची स्थिती का झाली नाजूक ?

29 जुलैच्या रात्री केरळमधील वायनाडमध्ये (Wayanad landslides) झालेल्या भूस्खलनात ४०० पेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त झाली आहेत. ५०० पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. लष्कर, नौदल, हवाई दल, एनडीआरएफ, पोलीस व केरळ (Kerala) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रात्री उशिरापर्यंत ढिगाऱ्याखालून १२३ मृतदेह बाहेर काढले आहेत. अद्यापही शेकडो लोक दबले गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा – Ind vs SL, 3rd T20 : तिसऱ्या टी-२० मध्ये सुपर ओव्हरमधील विजयासह भारताने मालिकाही ३-० ने जिंकली )

पहाटे १ ते ५ च्या दरम्यान चुरल डोंगराच्या एकापाठोपाठ तीन दरडी कोसळल्याने डोंगराखालील चेल्लीयार नदीच्या पाणलोट क्षेत्रात वसलेली चुरलमाला, अट्टामाला, नूलपुझा व मुंडक्कई ही चहाबाग कामगारांची सुमारे २२०० लोकसंख्येची ४०० हून अधिक घरे मोठमोठे दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दोन दिवसांपासून येथे मुसळधार पाऊस पडत होता. संपूर्ण परिसर भूस्खलन प्रभावित आहे. अनर्थ होण्याच्या भीतीने अनेक कुटुंबे जागी होती.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन (P. Vijayan) यांनी सांगितले की, ३८०० लोकांना ४५ मदत छावण्यांत हलवले आहे. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये लष्कराचे २०० जवान, वायुसेनेचे २ हेलिकॉप्टर आणि नौदलाचे ३० तज्ज्ञ बचावकार्यात गुंतले आहेत. पंतप्रधान व राष्ट्रपतींनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. राहुल गांधी व प्रियांका गांधी बुधवारी घटनास्थळी भेट देणार आहेत.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे उपमहासंचालक डॉ. शैबल घोष यांच्या मते, २०१८ नंतर केरळमध्ये कमी कालावधीत जास्त पाऊस पडत आहे. ६ किमीवरील डोंगराचा ढिगारा गावांमध्ये पोहोचला. चेल्यार नदीत दोन भागांत पाणी आणि ढिगारा दोन भागात वाहत गावांपर्यंत पोहोचल्याने सर्व काही जमीनदोस्त झाले. २०१९ मध्ये पुथुमालात अशीच भूस्खलने झाली होती. तेव्हा १७ लोकांचा मृत्यू झाला होता.

केरळची स्थिती का झाली नाजूक ?

अरबी समुद्राच्या तापमानवाढीमुळे दाट ढग तयार होऊन केरळमध्ये अल्पावधीतच अतिवृष्टी व भूस्खलनाच्या घटनात वाढ झाली. देशातील ८० टक्के ते ८५ टक्के भूस्खलने फक्त केरळमध्ये होतात. वायनाड हा डोंगराळ जिल्हा आहे. येथे २१०० मी. उंच डोंगर असल्याने पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका जास्त असतो. जेथे ही घटना घडली तेथे २ आठवड्यांपासून पाऊस सुरू असल्याने डोंगराची माती सैल झाली होती. त्यामुळे सलग तीन वेळा भूस्खलन झाले. केरळ विद्यापीठाने केलेल्या संशोधनात आढळले की, २०१८ च्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ४०० लोकांना जीव गमवावा लागला होता. कमी वेळात जास्त पाऊस पडत असल्याने भूस्खलन क्षेत्रात ३.४६ टक्के वाढ झाली आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या मते, २०१५ ते २०२२ या काळात झालेल्या ३,७८२ भूस्खलनांपैकी ५९.२ टक्के भूस्खलन केरळमध्ये झाले. (Wayanad landslides)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.