पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वच मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असून, राज्यातील एका मंत्र्यांचे मंत्रीपद धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. धोक्यात येणाऱ्या मंत्र्यांपैकी रावसाहेब दानवे यांचे नाव अग्रक्रमावर असून, त्यांच्या कामगिरीवर मोदी समाधानी नसल्याची माहिती मिळत आहे. मोदी सरकारमध्ये रावसाहेब दानवे यांना मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र त्यांचा तितकासा प्रभाव पडत नसल्याने त्यांना डच्चू मिळू शकतो.
रावसाहेब दानवे फक्त मतदारसंघापुरते मर्यादित!
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकार एका आक्रमक चेहऱ्याच्या शोधात होते. मात्र केंद्रीय मंत्रीपद असूनही रावसाहेब दानवे हे स्वत:च्या मतदार संघापुरते मर्यादीत राहिले आहेत. त्याचमुळे आता महाराष्ट्रातील एका आक्रमक चेहऱ्याला केंद्रीय मंत्री मंडळात सहभागी करून घेऊन शिवसेनेला कोंडीत पकडण्याची रणनीती केंद्र आखत आहे. याचमुळे आता जर राज्यात नव्यांना संधी द्यायची असेल, तर जुन्यांना डच्चू देण्याचा विचार केंद्राने केला असून, यामध्ये रावसाहेब दानवे यांचा नंबर लागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान राज्यातून नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर असे तीन कॅबिनेट मंत्री आहेत, तर रामदास आठवले, संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे हे तीन राज्यमंत्री आहेत. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी महाविकास आघाडी स्थापन करताना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीमाना दिलेला होता. राज्यातील तीन कॅबिनेट मंत्र्यांकडे एकेका मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार आहे. एकीकडे रावसाहेब दानवे यांचे मंत्रीपद धोक्यात असल्याची चर्चा सुरु असताना राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या देखील कारभारावर देखील अमित शहा आणि मोदी नाराज आहेत. त्यामुळे केंद्र कुणाला डच्चू देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचा : लालफितीत अडकला ‘लालपरी’च्या कर्मचा-यांचा पगार)
दानवेंचा राजकीय प्रवास
रावसाहेब दानवे हे गेली ३० वर्षे राजकारणात आहेत. गावचे सरपंच ते केंद्रीय मंत्री अशी त्यांनी राजकारणात भरारी घेतली आहे. 1990 ते 1995 आणि 1995 ते 1999 या दोन टर्ममध्ये ते भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर 1999 साली रावसाहेब दानवे यांनी पहिल्यांदा जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. सलग 5 वेळा जालना मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. मात्र 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यानंतर दानवे यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले होते. तसेच 2019 मध्ये पुन्हा देशात मोदींचे सरकार आल्यानंतर दानवेंना केंद्रीय राज्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community