छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ‘भारतभाग्यविधाता’; माजी राष्ट्रपती Ram Nath Kovind यांचे प्रतिपादन

94

छत्रपती शिवाजी महाराज हे ‘भारतभाग्यविधाता’ होते. त्यांचे चरित्र हे केवळ वाचण्यासाठी नसून त्यांचा प्रसार करणे हे भारतीय समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी बुधवारी केले. दिल्ली येथील हिंदवी स्वराज्य स्थापना महोत्सव समिती, पुणे येथील श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि श्रीभारती प्रकाशनातर्फे केदार फाळके लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज’, गजानन मेहेंदळे लिखित ‘छत्रपति शिवाजी महाराज न होते तो’ आणि पांडुरंग बलकवडे, सुधीर थोरात आणि मोहन शेटे लिखित ‘स्वराज्य संरक्षण का संघर्ष’ व ‘अठारहवी शताब्दी का हिंदवी साम्राज्य’ या मूळ मराठी पुस्तकांच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत झाला.

छत्रपती शिवाजी महाराज हे ‘भारतभाग्यविधाता’ आहेत. माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात सहभागी होणे भाग्याचे आहे. शिवाजी महाराजांची धोरणे आधुनिक युगास अनुकूल अशी होती. शौर्य, धर्म आणि नैतिकता हे त्यांचे विशेष गुण होते. त्यामुळेच ते अद्वितीय शासक ठरले. अशा महापुरुषांचे जीवन हे आजही प्रेरणादायी आहे, असे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी म्हटले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र केवळ वाचण्यासाठी नसल्याचे माजी राष्ट्रपती कोविंद (Ram Nath Kovind) यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, शिवचरित्र शक्य तेवढे आत्मसात करणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय समाजाचे कर्तव्य ठरते. शिवाजी महाराजांचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे अमोघ युद्धकला. गनिमी काव्याद्वारे त्यांनी युद्धकलेत असामान्य प्रभुत्व प्राप्त केले होते. गनिमी काव्याचा वापर ब्रिटिश साम्राज्याविरोधात बिहारमध्ये वीर कुंवरसिंह यांनीही केल्याचे संदर्भ आहेत. ही प्रेरणा छत्रपतींनीच दिली होती. शिवाजी महाराजांच्या शासनकाळात जनतेचे हित हे प्रधान होते. त्याने सदैव जनतेच्या हितांचे रक्षण केले होते. त्यांनी सदैव धर्म आणि संस्कृती यांचा सन्मान केला. हिंदवी स्वराज्य हेच त्यांचे मुख्य ध्येय होते. संपूर्ण हिंदुस्थानास गुलामीतून मुक्त करण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्यांनी आपल्या स्वराज्यास आत्मनिर्भर बनविले होते. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा ही कालातीत होती. स्वातंत्र्यलढा असो अथवा वर्तमान असो, आजही ही प्रेरणा महत्वाची ठरते. शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक ठरतात, त्यांनी नेहमीच काळाच्या पुढे जाऊन विचार केला होता. त्यांच्याच प्रेरणेने आज भारतीय नौदलाचे ध्वज आणि प्रतीके तयार करण्यात आली आहे, असेही माजी राष्ट्रपती कोविंद (Ram Nath Kovind) यांनी आपल्या संबोधनात नमूद केले.

(हेही वाचा – Mumbai Police: आता लवकरच मुंबई पोलिस घोड्यावरुन गस्त घालणार)

भारतात एक बाब अनेक वर्षांपासून कायम आहे. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) ज्या ज्या वेळी उल्लेख होतो, त्या त्या वेळी नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत होते. येणारी हजारो वर्षे ही भावना येतच राहणार आहे. त्यामुळे शिवाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान ठरतात. देशासाठी जगावे आणि गरज असल्यास देशासाठी मरावे, हा चिरंजीव विचार छत्रपतींनी दिला आहे. आपल्या जीवनकाळात त्यांनी अनेक उदात्त विचार राष्ट्राला दिले, असे रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले.

गुलामगिरी कशी झुगारून द्यावी, याचा आदर्श शिवाजी महाराजांनी घालून दिल्याचे होसबळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराज हे आपल्या जीवनकाळातच ‘लिजेंड’ झाले होते. केवळ भारतच नव्हे तर परदेशातील गुलामगिरी विरोधातील लढ्यांनाही त्याचे जीवन प्रेरणादायी ठरल्याचेही होसबळे यांनी यावेळी नमूद केले. मुंबईत १९६१ साली शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमा आपल्या दरवाजापर्यंत आली असती. यावरून हिंदवी स्वराज्याचे महत्त्व लक्षात येते. शिवाजी महाराजांना सिंहासनावर बसण्याची अभिलाषा नव्हती, तर त्यांना स्वत्व गमावलेल्या हिंदू समाजाला नवा अर्थ द्यायचा होता. भारतीय समाज साहसी असल्याचा आणि साम्राज्य स्थापन करण्यास सज्ज असल्याचा संदेश त्यांना द्यायचा होता.

हिंदवी साम्राज्याची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज

भारतात इतिहासाला विकृत करण्याचे प्रयत्न झाले. शिवाजी महाराजांच्या इतिहासालाही विकृत करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, शिवाजी महाराज हे स्वयंप्रकाशी असल्याने ते प्रयत्न फोल ठरले आहेत. शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचे नाहीत, ते अवघ्या भारतीय समाजाचे आहे. त्यांनी मराठा साम्राज्य नव्हे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, हे कोणीही विसरू नये, असेही सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सांगितले. (Ram Nath Kovind)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.