- ऋजुता लुकतुके
कोल्हापूरचा स्वप्निल कुसाळेला (Swapnil Kusale) गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. कारण, खाशाबा जाधव यांच्यानंतर ७८ वर्षांनी मराठी खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवलं आहे. ५० मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात स्वप्निलने ४५१.४ गुणांची कमाई करत कांस्य जिंकलं. खरंतर पात्रता फेरीत तो सातवा होता. त्यानंतर झोपून, गुडघ्यावर बसून आणि मग उभा राहून झाडायच्या प्रत्येकी १४ फैरीत पहिल्या दोन टप्प्यांनंतर तो आधी सहावा, मग पाचवा होता. पण, उभं राहून झाडलेल्या १५ फैरीत त्याने सगळी पिछाडी भरून काढली. तो चौथ्या क्रमांकापर्यंत वर चढला. बाद फेरी सुरू झाली तेव्हा त्याने आणखी जोर मारत कांस्यही नावावर केलं.
Swapnil Kusale secures a third medal 🥉 for India at #Paris2024 🥳#OlympicsOnJioCinema #OlympicsOnSports18 #JioCinemaSports #Shooting #Cheer4Bharat pic.twitter.com/1EEutHpeUY
— JioCinema (@JioCinema) August 1, 2024
भारतासाठी यंदा नेमबाजीतील हे तिसरं पदक ठरलं आहे. २८ वर्षीय स्वप्निल कुसाळेचा (Swapnil Kusale) जन्म पुण्याचा आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात कंबळवाडी इथं राहतो. पण, नेमबाजीच्या निमित्ताने काही वर्षं पुण्यात बालेवाडी इथं सराव करत आहे. त्याला खेळावर लक्ष केंद्रीत करता यावं म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी शुक्रवारपर्यंत त्याच्याशी संपर्कही केला नव्हता. आता मात्र कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत विजयोत्सव साजरा होत आहे.
(हेही वाचा- Sion Bridge : वाहतुकीसाठी सायन पूल बंद! ऑफिसला जाणारे कर्मचारी वाहतुक कोंडीत अडकले)
२०२२ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्वप्निलने (Swapnil Kusale) चौथं स्थान पटकावत ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती. आणि त्यानंतर आशियाई क्रीडास्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशनच्या सांघिक प्रकारात त्याने सुवर्ण जिंकलं होतं. स्वप्निलच्या आतापर्यंच्या कामगिरीवर एक नजर टाकूया,
-
स्वप्निलने अंतिम फेरीत ४४१.४ गुणांची कमाई करत ५० मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे.
-
या प्रकारात पात्रता फेरीत स्वप्निलने ५९० गुणांची कमाई केली होती.
-
२०२२ मध्ये कैरो इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्वप्निल चौथा आला. तिथेच त्याने ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती
-
२०२२ च्या आशियाई क्रीडास्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्ण
-
२०२३ च्या बाकू इथं झालेल्या विश्वचषकात मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण, तर वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत त्याने रौप्य जिंकलं होतं
-
२०२२ च्या अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक प्रकारात कांस्य
-
२०२१ च्या विश्वचषक स्पर्धेत सांघिक सुवर्ण
हेही पहा-
Join Our WhatsApp Community