मुंबईत निर्बंध, लोकल बंद, तरी सरकारचे फर्मान ‘शिक्षकांनो, शाळेत हजर व्हा!’ 

शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता १ली ते ९वी आणि ११वी पर्यंत ५० टक्के, तर इयत्ता १०वी आणि १२वी १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

134

मुंबईत जरी रुग्ण संख्या कमी झाली असली, तरी राज्य सरकारने मुंबईला अनलॉकच्या धोरणामध्ये लेव्हल ३ मध्ये टाकले आहे. त्यामुळे लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी प्रतिबंधीत करण्यात आला आहे. अशा वेळी १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून, राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शाळेत पोहचायचे कसे, असा प्रश्न पहिल्याच दिवशी शिक्षकांना पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पुन्हा एकदा राज्य सरकारला पत्र लिहून लोकल प्रवासासाठी शिक्षकांना परवानगी देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

…तर दहावीच्या निकालावर परिणाम! 

त्या आधी १४ जूनपासून १०वीच्या निकालाचे काम सुरु करण्यासाठी शिक्षकांना शाळेत १०० टक्के उपस्थिती सांगितली. त्याप्रमाणे मुंबईतील शाळांमध्ये ७० टक्के शिक्षक हे ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई ह्या जिल्ह्यांमधून येत असतात. त्यांना लोकल प्रवासाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा नाही, अशा परिस्थितीत शिक्षकांनी पहिल्या दिवशी विना तिकीट लोकल प्रवास करून शाळा गाठल्या. अनेक शिक्षकांना दंड भरावा लागला. तरीही १४ जून रोजी तुरळक संख्येने शिक्षक शाळांमध्ये पोहचू शकले. अशीच परिस्थिती राहिली तर मात्र शिक्षकांना शाळेत पोहचणे कठीण जाणार आहे. त्याचा थेट परिणाम दहावीच्या निकालावर होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.मुंबईतील शाळांमध्ये एकूण १३ हजार ३०० शिक्षक १०वीच्या निकालाचे काम करणार आहेत.

(हेही वाचा : दहावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षकांना भरावा लागतोय दंड!)

काय म्हटले आहे शासनाच्या आदेशात? 

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना १४ जूनपर्यंत सुटी जाहीर होती. त्यानुसार १५ जूनपासून २०२१-२२ हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे उपस्थिती अनिवार्य आहे

  • इयत्ता १ली ते ९वी आणि ११वी पर्यंत ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य
  • इयत्ता १०वी आणि १२वी १०० टक्के उपस्थिती अनिवार्य
  • शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थितीत १०० टक्के अनिवार्य प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालायचे प्राचार्य यांची १०० उपस्थिती अनिवार्य
  • बृहन्मुंबईतील शिक्षकांसाठी लोकल प्रवासाच्या सोयींबाबत लवकरच यथोचित निर्णय घेण्यात येईल.
  • कोविड परिस्थितीमुळे पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन आणि इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालू ठेवावे.

letter 1

मुंबईतील एसटी बसगाड्याही बंद! 

मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट बस सेवेला मदत म्हणून २०० एसटी बसगाड्या धावत होत्या. मात्र एसटी महामंडळाने या सर्व एसटी बसगाड्या आता परत माघारी बोलावून घेतल्या असून २ दिवसांपासून मुंबईत या बसगाड्या धावत नाहीत. त्यामुळे एका बाजूला लोकल प्रवासाला परवानगी नाही, दुसरीकर एसटी बसगाड्या बंद आहेत. परिणामी सगळी गर्दी ही बेस्टच्या बसगाड्यांमध्ये जमू लागली आहे. परिणामी सोशल सिस्टन्स या नियमाचा पुरता बोऱ्या वाजला आहे. अशा परिस्थितीत बेस्ट बसगाड्यांमधून प्रवास करणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात सरकारच्या परिपत्रकात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केल्याने त्यांचीही कोंडी झाली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सरकारच्या धोरणामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे.

(हेही वाचा : १५ दिवसांत १७ लाख विद्यार्थ्यांचा निकाल तयार होणार! एसएससी बोर्ड विश्वविक्रम करणार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.