- सचिन धानजी,मुंबई
मुंबईत मल वाहून नेणाऱ्या मलनि:सारण वाहिन्या या अनेक ठिकाणी जुन्या आणि जीर्ण झाल्याने त्यातील मल हा मॅनहोल्स (Manholes) मधून बाहेर वाहून जात आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहेत. परिणामी लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व विभागातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या तथा खराब झालेल्या मल वाहिन्यांची तपासणी करण्यात येत असून यामध्ये मालाड आणि गोरेगाव या भागातील तब्बल ३८ ठिकाणी या मलवाहिन्या खराब झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या खराब झालेल्या मलवाहिन्यांतून मल उघड्यावर वाहण्याचे प्रकार घडत आहे.
मुंबईत सुमारे २०५२ कि. मी. लांबीच्या मलवाहिन्यांचे जाळे पसरले आहे. या मलवाहिन्यांपैकी, २२५ मि. मी. ते ३०० मि. मी. व्यासांच्या अर्थात मनुष्य प्रवेश शक्य नसलेल्या सुमारे १४८८ कि. मी. लांबीच्या नलिका मलवाहिन्या आहेत. मलनि:सारण वाहिन्यांच्या दीर्घकालीन वापरानंतर घर्षणाने झीज होणे, गाळ जमा होणे तसेच झाडांची मुळे आत येणे अशा विविध कारणांमुळे मलवाहिन्या (Manholes) खराब होते. परिणामी अनेकदा, मलवाहिन्या कोसळल्याने किंवा खराब झाल्याने मलजलाचा निचरा होत नसल्याने त्यातील मल बाहेरील बाजूस वाहिला जातो. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
(हेही वाचा – MVA Conflict : मविआ’त जागावाटप कळीचा मुद्दा; शरद पवार काँग्रेस-उबाठाला देणार झटका?)
त्यानुसार महापालिकेच्या गोरेगाव पी दक्षिण विभाग आणि मालाड पी उत्तर विभागातील ३८ ठिकाणी मलवाहिन्या जुन्या तसेच खराब झालेल्या असून त्यातून बऱ्याचदा मल रस्त्यावर वाहिला जातो. त्यामुळे या मलवाहिनींची (Manholes) नव्याने टाकण्याचे काम हाती घेतले जाणार नसून मनुष्य प्रवेश शक्य नसलेल्या मलवाहिन्यांचे चरविरहित तंत्रज्ञान वापरुन पुनर्वसन करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अशाप्रकारे १२ किमी लांबीच्या मलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाड आणि गोरेगावमधील ३८ ठिकाणी मलवाहिनी (Manholes) खराब झाल्याने त्यातून होणारी मलाची गळती लक्षात घेता यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १२ किमी लांबीच्या आणि २२५ ते ३०० मि. मी. व्यासाच्या मलवाहिन्या या जीर्ण झाल्याने त्या बदलण्यात येणार आहे. यासाठीचे काम लवकरच केले जाणार आहे. या कामांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये व्हर्गो स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली असून याकरता ५८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मनुष्य प्रवेश आणि मनुष्यप्रवेश नसलेल्या मलवाहिनींची लांबी आहे अशाप्रकारे
- ९०० मि. मी. पेक्षा जास्त व्यासाच्या, (सुमारे १५३ कि. मी. लांबीच्या)
- ९०० मि. मी. व्यासापर्यंतच्या (सुमारे १८९९ कि. मी. लांबीच्या)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community