Aguada Fort : जाणून घ्या अगुआडा किल्ल्याबद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये! 

252
Aguada Fort : जाणून घ्या अगुआडा किल्ल्याबद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये! 
अगुआडा किल्ला (Aguada Fort) हा सतराव्या शतकातला पोर्तुगीजांच्या काळातला किल्ला आहे. हा किल्ला भारतातल्या गोवा राज्यातल्या सिंक्वेरिम बीचवर उभारलेला आहे. अरबी समुद्राकडे वळलेल्या या किल्ल्यावर लाईटहाऊसही आहे. हा किल्ला म्हणजे गोव्यात असलेलं राष्ट्रीय आणि महत्त्वाचं ASI संरक्षित स्मारक आहे.
किल्ल्याचा इतिहास
●हा किल्ला १६१२ साली पोर्तुगीजांनी डच लोकांपासून संरक्षण करण्यासाठी बांधला होता. त्या वेळी युरोपमधून येणाऱ्या जहाजांसाठी हा किल्ला एक महत्त्वाचे केंद्र होता.
●हा पोर्तुगीज किल्ला मांडोवी नदीच्या किनाऱ्यावर कँडोलिमच्या दक्षिणेला समुद्रकिनाऱ्यावर उभा आहे. सुरुवातीला शिपिंग आणि जवळच्या बार्डेझ नावाच्या उप-जिल्ह्याच्या संरक्षणाची जबाबदारी या किल्ल्यावरून पार पडली जायची.
●अगुआडा किल्ल्यातल्या गोड्या पाण्याच्या झऱ्यामुळे त्या काळी जहाजांना पाणीपुरवठा होत असे. अगुआडा या शब्दाचा अर्थ पोर्तुगीज भाषेमध्ये ’पाणी’ असा होतो. इथल्या गोड्या पाण्याच्या झऱ्यांमुळे किल्ल्याला अगुआडा असं म्हटलं गेलं. इथून जाणाऱ्या जहाजांचे कर्मचारी त्यांच्या जहाजावरचा गोड्या पाण्याचा कमी झालेला साठा पुन्हा भरण्यासाठी अनेकदा या किल्ल्याला भेट देत असत.
●१८६४ या अगुआडा किल्ल्यावर लाईटहाऊस उभारण्यात आलं होतं. अगुआडा किल्ल्यावरचं (Aguada Fort) लाईटहाऊस हे आशियातलं सर्वात जुनं लाईटहाऊस आहे.
●एकेकाळी या किल्ल्यावर ७९ तोफांचं भव्य स्टँड होतं. या किल्ल्यामध्ये २,३७६,००० गॅलन पाणी साठवण्याची क्षमता आहे. हा साठा म्हणजे त्या काळातला आशियातल्या सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या साठ्यांपैकी एक आहे.
●अगुआडा किल्ला हा दोन विभागांमध्ये विभागलेला आहे. या किल्ल्याचा वरचा भाग किल्ला आणि पाण्याचा साठा आहे. तर खालचा भाग हा पोर्तुगीज जहाजांसाठी सुरक्षित बर्थ म्हणून काम करतो. किल्ल्याच्या वरच्या भागात खंदक, भूगर्भातलं पाणी साठवण कक्ष, गनपावडर रूम, लाईटहाऊस आणि बुरुज आहेत. एवढंच नाही तर या किल्ल्यात युद्ध आणि आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी एक गुप्त भुयारी मार्ग देखील आहे. सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या लाईटहाऊसचा वापर ७ मिनिटांतून एकदा प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी केला जातो.
●अगुआडा किल्ला हा पोर्तुगीजांचा सर्वात मौल्यवान आणि महत्त्वाचा किल्ला होता. हा किल्ला इतका मोठा आहे की, तो बार्डेझच्या नैऋत्य टोकाचा संपूर्ण द्वीपकल्प व्यापतो. मांडोवी नदीच्या मुखावर बांधलेला हा किल्ला युद्धाच्या दृष्टीने बांधलेला होता. तसंच डचांपासून पोर्तुगीजांचे संरक्षण कवच होते.
●सालाझार प्रशासनाच्या काळात अगुआडा किल्ल्याला सालाझारच्या राजकीय विरोधकांसाठी तुरुंग म्हणून वापरण्यात येत होता असा काहींचा दावा आहे.
●अगुआडा मध्यवर्ती कारागृह हा किल्ल्याचाच एक भाग आहे. २०१५ सालापर्यंत ते गोव्यातलं सर्वात मोठं कारागृह होतं. १७व्या शतकातल्या पोर्तुगीज-युगीन संरचनेचं गोवाचं हेरिटेज असलेल्या आणि गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांचं स्मारक असलेल्या या तुरूंगाचं गोवा पर्यटन विकास महामंडळाने नूतनीकरण केलं आहे. हे तुरुंग पर्यटकांसाठी खुलं केलं आहे. पर्यटकांना गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रदर्शन दाखवण्यासाठी तसंच गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढलेल्या, तिथल्या तुरुंगात डांबलेल्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली म्हणून त्यांचा इतिहास इथे लिहिलेला आहे. या तुरूंगाचं उद्घाटन १९ डिसेंबर २०२१ साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आलं.
●या संग्रहालयात स्वातंत्र्यसेनानी टी.बी. कुन्हा आणि राम मनोहर लोहिया यांना समर्पित दोन खास सेल राखीव आहेत. या सेलमध्ये त्यांना पोर्तुगीज राजवटीत तुरुंगात टाकण्यात आले होते.
या किल्ल्यावर पोर्तुगीज तोफांचाही समावेश आहे आणि गोव्याच्या वसाहतविरोधी लढ्याची अनेक स्मारके आहेत.
●ताज फोर्ट अगुआडा (Aguada Fort) रिसॉर्ट
ताज फोर्ट अगुआडा रिसॉर्ट हा ताज हॉटेल ग्रुपचा भाग आहे. हे हॉटेल १९७४ साली ऐतिहासिक पोर्तुगीज किल्ला अगुआडा येथे उघडण्यात आलं होतं.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.