Paris Olympic 2024 : अल्काराझला हरवत नोवाक जोकोविचचं पहिलं ऑलिम्पिक सुवर्ण

Paris Olympic 2024 : अंतिम फेरीत जोकोविचने अल्काराझचा ७-६, ७-६ असा पराभव केला.

157
Paris Olympic 2024 : अल्काराझला हरवत नोवाक जोकोविचचं पहिलं ऑलिम्पिक सुवर्ण
  • ऋजुता लुकतुके

३७ वर्षीय सर्बियन नोवाक जोकोविचच्या खात्यात २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहेत. जगातील सगळ्या स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. पण, आतापर्यंत तो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकू शकला नव्हता. कारकीर्दीत अखेरच्या टप्प्यावर आलेल्या जोकोविचने जिद्दीने ही कसर यंदा भरून काढली. अंतिम फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा ७-६ आणि ७-६ असा पराभव करत जोकोविचने सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं. (Paris Olympic 2024)

खचाखच भरलेल्या स्टेडिअममध्ये जोकोविचने निर्धार आणि लढाऊ बाणा दाखवून युवाशक्ती आणि नदालचा वारसा चालवणारा खेळाडू अशी ओळख असलेल्या अल्काराझला हरवलं. बाजिंग, लंडन, रिओ आणि लंडन अशा लागोपाठ चार ऑलिम्पिकमध्ये जोकोविचने प्रयत्न करूनही त्याला गोल्डनस्लॅम पूर्ण करता आला नव्हता.

(हेही वाचा – Ajit Pawar Jan Sanman Yatra ८ ऑगस्टपासून दिंडोरीतून होणार सुरू)

सामना दोन सेटमध्येच संपला असं वाटत असेल तर पहिला सेटच १ तास ३३ मिनिटं चालला. दोघं खेळाडू प्रत्येक गुणासाठी झगडत होते आणि प्रत्येक गेम रंगतदार झाला. अखेर ६-६ अशा बरोबरीनंतर टायब्रेकवर अल्काराझकडून काही चुका झाल्या. आणि पहिला गेम जोकोविचला मिळाला. पुन्हा दुसऱ्या सेटमध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. चुरसीच्या लढतीनंतर हा सेट खिशात टाकत जोकोविचने सामना आणि सुवर्ण पदकही जिंकलं. (Paris Olympic 2024)

सामना संपल्यानंतर जोकोविचने आकाशाकडे नजर रोखून पाहिलं आणि त्यानंतर कोर्टच्या मध्यावर तो गुडघ्यांवर बसला. यावर्षी त्याची कामगिरी तितकीशी चांगली नव्हती. विक्रमी २५ वं ग्रँडस्लॅम विजेतेपद त्याला हुलकावणी देत आहे. याउलट २१ वर्षी अल्काराझने यावर्षी विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन या दोन्ही ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. तरीही जिद्दीने जोकोविचने सुवर्ण पदक जिंकलं. या विजेतेपदानंतर जोकोविच आंद्रे आगासी, स्टेफी ग्राफ, सेरेना विल्यम्स आणि राफेल नदाल यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.