‘माझ्या नादी लागला तर *** गोळ्या घालेल’ हे वाक्य आहे पोटच्या दोन मुलांवर गोळ्या झाडणाऱ्या सैतान बापाचे! भगवान पाटील वय वर्षे ७१ असे या सैतान बापाचे नाव आहे. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर-३ मध्ये त्याचे वास्तव्य आहे. १२ वर्षांपूर्वी नवी मुंबई पोलिस दलातून जमादार पदावरुन निवृत्त झालेल्या भगवान पाटील यांना, विजय आणि सुजय ही दोन मुले. दोघेही वडिलांच्या शीघ्रकोपी स्वभावामुळे वडिलांपासून वेगळे राहत असत. विजय हा वसई येथे तर सुजय हा एरोलीतच घर घेऊन पत्नीसह राहतो.
नही तो गोली मार दूंगा
पोलिस दलातून निवृत्त होण्यापूर्वी भगवान पाटील याने बऱ्यापैकी संपत्ती कमवली होती. नवी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी त्याने घरे घेऊन ठेवलेली आहेत. त्या घरांच्या भाड्यापोटी भगवान पाटील महिन्याला लाख ते दीड लाख रुपये कमावत होता. स्वतःला फिरण्यासाठी भगवान पाटील याने इनोव्हा हे चारचाकी वाहन घेतले होते. सोबत त्याने पिस्तुलाचा परवाना घेऊन, एक पिस्तुल तो सोबत बाळगत होता. शीघ्रकोपी स्वभावाचा भगवान पाटील हा दारू प्यायल्यानंतर सैतान होऊन, शुल्लक कारणांवरुन कुणालाही, माझ्या नादी लागाल तर *** गोळी घालेल… अशी धमकी देत असे. हे धमकीचे वाक्य त्याचे ठरलेले असायचे, असे परिसरातील लोक सांगतात.
(हेही वाचाः मुलावर झाडल्या वडिलांनी गोळ्या… काय आहे कारण?)
हे आहेत भगवानचे किस्से
भगवान पाटीलच्या एका नातलगाने तर पाटील यांचा एक किस्सा सांगितला. भगवान पाटील राहत असलेल्या रो हाऊसचे काम करण्यासाठी त्यांनी एका कंत्राटदाराला बोलावून घेतले होते. त्या कंत्राटदाराला कामाचा खर्च पाटील ने विचारला असता त्याने काही लाखांच्या घरात खर्च सांगितला होता. पाटील याने कामासाठी होकार देत कंत्राटदाराला घरातच दारू पार्टी दिली. दिलदार माणूस असल्याचे समजून कंत्राटदाराने रो -हाऊस चे काम सुरू केले. पाटील कंत्राटदाराला नियमित दारुची पार्टी देत असल्यामुळे, कंत्रादाराच्या मनात पाटील बद्दल आपुलकी निर्माण झाली होती. मात्र घराचे काम संपल्यानंतर कामाचे पैसे मागणाऱ्या कंत्राटदाराच्या समोर पाटीलचा खरा चेहरा समोर आला. घराचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने पाटीलकडे उर्वरित पैशांची मागणी करताच, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेरीस पाटील याने कामाचे पैसे मागणाऱ्या कंत्राटदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून, आपला नेहमीचाच डायलॉग बोलून धमकी दिली होती. एकदा तर भगवान पाटील याने स्वतःच्या मेहुण्यावर पिस्तुल ताणून त्याला धमकी दिली होती. भगवान पाटील यांच्यावर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारी देखील झालेल्या होत्या.
(हेही वाचाः केकमधून गांजा : भारतात नशेचा नवा ट्रेण्ड!)
अखेर मुलाची हत्या
भगवान पाटील यांनी स्वतःच्या वापरासाठी घेतलेल्या इन्होवा मोटारीच्या दुरुस्ती आणि इन्शुरन्सचे १२ हजार रुपये थकले होते. पोलिसी रुबाब दाखवून पाटील हे थकीत पैसे देत नसल्यामुळे, संबंधिताने भगवान पाटीलच्या वसईतील मुलगा विजयला फोन करुन बडबड केली होती. विजयने याबाबत वडील भगवान पाटील यांना फोन करुन कळवले होते व त्यातून दोघांचा फोनवर वाद झाला होता. भगवान पाटील याने विजय याला फोन करुन सोमवारी घरी बोलावून घेतले व मोठा भाऊ आल्यामुळे जवळच राहणारा सुजय देखील घरी आला होता. सायंकाळी विजयने थकीत पैशांचा विषय काढला असता त्यावरुन वाद सुरू झाला. दारुच्या नशेत असणाऱ्या भगवानचा पारा चढला. त्याने पुढचा मागचा विचार न करता कमरेची पिस्तुल काढून विजयवर तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या विजयला आणि एक गोळी सुजयच्या पोटाला चाटून गेली. या गोळीबारात विजयचा मृत्यू झाला असून, सुजय जखमी झाला आहे.
Join Our WhatsApp Community