- सचिन धानजी,मुंबई
ठाणे पाठोपाठ आता पहिली सिग्नल शाळा (Signal School) आता मुंबईत उभी राहणार आहे. सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडच्या उड्डाणपुलाखालील अमर महल जंक्शन येथील मोकळ्या जागेवर ही सिग्नल शाळा उभारण्यात येणार आहे. अनेक बेघरांचे जगण्याचे साधन हे सिग्नल असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुटुंबातील सर्व सदस्य सिग्नलच्या वेळी सामान विकू लागले आहेत. या लहान मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या सिग्नल शाळांची निर्मिती केली जाणार आहे. मुंबईतील हि पहिली सिग्नल शाळा ठरणार आहे.
(हेही वाचा – Ind vs SL, ODI Series : टी-२० प्रभावामुळे भारतीय संघ हरला का? प्रश्नावर रोहितचं बाणेदार उत्तर)
मुंबईतील पहिली सिग्नल शाळा
मुंबईतील बेघर मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिफारशीनुसार अभिनव उपक्रम हाती घेत आहे. या असुरक्षित मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांच्या बौध्दिक विकासाला चालना देणे आणि उज्ज्वल भविष्याची संधी सुनिश्चित करणे हा याप्रकल्पाचा उद्देश असून महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी नियोजन विभागाच्यावतीने सांताक्रुझ चेंबर लिंक रोडवरील चेंबूर अमर महल जंक्शन येथील मोकळ्या जागेत सिग्नल शाळा उभारण्याचा निर्णय घेतला असून ही सिग्नल शाळा (Signal School) मुंबईतील पहिली सिग्नल शाळा ठरणार आहे.
देशातील अनेक लोक जगण्याच्या शोधात मुंबईत आले असून त्यातील काही लोक हे उड्डाणपूलाखाली मोकळ्या जागेत स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे सिग्नल हे त्यांचे जगण्याचे साधन बनले असून लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत कुटुंबातील सदस्य हे सिग्नलला सामान विकू लागले आहेत. याद्वारे त्यांनी स्वत:साठी जगणे शोधले असून हे चित्र बदलण्यासाठी ठाणे तीन हात नाका येथील जागेत १४ जानेवारी २०१६ रोजी समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने सिग्नल शाळा सुरु केली होती. त्याच धर्तीवर मुंबईत पहिली सिग्नल शाळा सुरु केली जात आहे. ठाण्यातील या शाळेला सात वर्षे झाली असून त्यात ४६ नियमित विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत.
(हेही वाचा – Parliament Security : संसदेतील पोलिसांना विशेष ड्युटी कार्ड जारी)
लवकरच होणार शाळा सुरु
उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ही सिग्नल शाळा सुरु केली जात असून त्यांनी यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी मंजूर करून दिला आहे. यासाठी दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या सिग्नल शाळा उभारणीच्या कामासाठी मानेक ट्रेडर्स या कंपनीची निवड केली आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये या शाळेचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
यासंदर्भात संचालक (नियोजन विभाग) प्राची जांभेकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उपनगरे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या सिग्नल शाळेचे (Signal School) बांधकाम चेंबूर येथील अमर महल येथील उड्डाणपूलाच्या मोकळ्या जागेत केले जात आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून याचे भूमीपुजन झाल्यानंतर तीन महिन्यांमध्ये याचे काम पूर्ण होईल. या ठिकाणी कंटेनरमध्ये ही सुविधा दिली जाणार असून सिवर लाईन आणि पाण्याची लाईन तसेच विद्युत कामे पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षात य शाळेचा लाभ सिग्नलवरील मुलांना होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community