आरे वसाहतीतील (Aarey Colony) मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात असून या काँक्रिटीकरण कामात गुणवत्ता न राखणाऱ्या कंत्राटदार, गुणवत्ता देखरेख संस्था यांच्यावर महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. समवेत कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अभियंत्यांना लेखी सक्त ताकीद दिली आहे. कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईबरोबरच त्याने स्व:खर्चाने काँक्रिट रस्त्याचा बाधित भाग पुन्हा नव्याने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, रस्ते कामात पुन्हा त्रुटी केल्यास दुप्पट दंड आकारण्याचा तसेच, तिसऱ्यांदा त्रुटी केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे. निविदेतील अटी-शर्तीनुसार गुणवत्ता देखरेख संस्थेने, कंत्राटदाराकडून गुणवत्तापूर्ण कामे करवून घ्यावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असे बजाविण्यात आले आहे.
सिमेंट काँक्रिट रस्ते कामातील त्रुटी निदर्शनास
मुंबई महानगरपालिकेने सर्व रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत असून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे रस्ते कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेत आहेत. महानगरपालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाने गोरेगाव-आरे वसाहतीतील (Aarey Colony) मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी कंत्राटदारासह गुणवत्ता देखरेख संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देत या रस्ते कामाची नुकतीच पाहणी केली. आरे वसाहत मुख्य रस्ता (दिनकरराव देसाई मार्ग) अंतर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गापासून मोरारजी नगरपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण व इतर ठिकाणांची बांगर यांनी पाहणी केली होती. त्यावेळी सिमेंट काँक्रिट रस्ते कामातील त्रुटी निदर्शनास आल्या.
(हेही वाचा – World Indigenous Day 2024 : मूल निवासी दिन का पाळला जातो? युरोप आणि ख्रिस्त्यांच्या अत्याचाराची विद्रुप कहाणी!)
अपेक्षित दर्जा राखून काम पूर्ण करावे
काही ठिकाणी काँक्रिट रस्त्यांना मोठ्या तर काही ठिकाणी किरकोळ भेगा पडल्याचे, तडे गेल्याचे तर काही ठिकाणचा पृष्ठभाग जीर्ण झाल्याचे, पोत न राखल्याचे आढळले. याची गंभीर दखल घेत, गुणवत्ता न राखणारे कंत्राटदार, गुणवत्ता देखरेख संस्था आणि संबंधित अभियंत्यांवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कंत्राटदार आणि गुणवत्ता देखरेख संस्थेने निर्देशानुसार आणि अपेक्षित दर्जा राखून काम पूर्ण करावे, अशी सक्त तंबीही देण्यात आली आहे.
भविष्यात महानगरपालिकेच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यास अपात्र
कंत्राटदाराने तडे गेलेले, पोत न राखलेले आणि काँक्रिट पृष्ठभागावर जीर्ण दोष आढळलेले भाग तातडीने काढावेत. बाधित भाग नव्याने तयार करावेत. या कार्यवाहीमध्ये नजीकच्या पटलांचाही (ऍडजेस्टमेंट पॅनेल) समावेश करावा. प्रारंभिक त्रुटींमुळे झालेल्या खर्चाच्या रकमेचा तसेच त्याच्या समतुल्य दंडाची कपात कंत्राटदाराच्या देयकामधून करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी पुन्हा आढळल्यास, दुप्पट दंडाची आकारणी करण्यात येईल. तसेच तिसऱ्यांदा त्रुटी आढळल्यास, भविष्यात महानगरपालिकेच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यास अपात्र ठरविण्यात येईल, असा सक्त इशारा देण्यात आला आहे.
(हेही वाचा – बीडमध्ये Raj Thackeray यांचा ताफा उबाठा गटाने अडवला; दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने)
दंडाची रक्कम गुणवत्ता देखरेख संस्थेकडून वसूल
तर गुणवत्ता देखरेख संस्था (Quality Monitoring Agency) कंत्राटदाराकडून निविदेतील अटी-शर्तीनुसार गुणवत्तापूर्ण कामे करवून घेण्यास अपयशी ठरली आहे. त्यामुळे गुणवत्ता देखरेख संस्थेसही दंड आकारण्यात आला आहे. रस्त्याचा बाधित भाग नव्याने करण्यासाठी येणारा खर्च व त्याच्या समतुल्य दंडाची रक्कम गुणवत्ता देखरेख संस्थेकडून वसूल केली जाणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी पुन्हा आढळल्यास, दुप्पट दंडाची आकारणी करण्यात येईल. तिसऱ्यांदा त्रुटी आढळल्यास, भविष्यात महानगरपालिकेच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यास अपात्र ठरविण्यात येईल, असा सक्त इशारा देखील गुणवत्ता देखरेख संस्थेस देण्यात आला आहे. तसेच, या कामात कोणत्याही उणीवा राहणार नाहीत, यासाठी अधिक दक्ष, सजग राहून कामकाज करावे, अशी लेखी समज संबंधित अभियंत्यांना देण्यात आली आहे.
दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त अधिक तीव्र कारवाई
महानगरपालिकेच्या रस्ते कामांमध्ये अत्युच्च गुणवत्ता राखली जावी, यासाठी महानगरपालिका प्रशासन दक्ष आहे. कमी गुणवत्तेची कामे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत. तसेच त्यावर दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त अधिक तीव्र कारवाई केली जाऊ शकते, याची कंत्राटदारांनी दखल घेणे गरजेचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.
गुणवत्ता देखरेख संस्थांही तेवढेच जबाबदार
गुणवत्ता देखरेख संस्था यांना महानगरपालिका नियुक्त करते. रस्ते कामांची गुणवत्ता राखली जावी, हा त्यामागचा उद्देश असून त्यांना महानगरपालिका स्वतंत्र रक्कम अदा करते. जर निकृष्ट काम झाले तर, कंत्राटदारांसोबतच गुणवत्ता देखरेख संस्थांनाही तेवढेच जबाबदार धरले जाईल, ही बाब देखील महत्त्वाची आहे. कामात गुणवत्ता रहावी यासाठी अभियंत्यांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे त्यांनादेखील इशारा देण्यात आला आहे. (Aarey Colony)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community