MNS : आमदारकी, खासदारकीपेक्षा हिंदुत्त्व मोठे!

172
MNS : आमदारकी, खासदारकीपेक्षा हिंदुत्त्व मोठे!
MNS : आमदारकी, खासदारकीपेक्षा हिंदुत्त्व मोठे!
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

इतर वेळी मराठी अस्मितेचा पुळका आलेले लोक वरळीतील गुजराती लोकांना आकर्षित करण्यासाठी ‘केम छो वरली’ असा बॅनर झळकवतात. त्याचबरोबर अदानी-अंबानीच्या नावाने बाहेर बोटे मोडून, मराठी माणसाच्या मनात या श्रीमंत लोकांबद्दल द्वेष पसरवून स्वतः मात्र त्यांच्या लग्नसोहळ्यात जातात आणि थिरकतात सुद्धा. त्यामुळे अशा राजकारण्यांचा कुटील स्वभाव मराठी माणसाला कळून चुकला आहे. आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा स्वतंत्र लढणार आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) हे हिंदुत्त्ववादी घराण्यातून आले असले तरी गेली सुमारे १० वर्षे त्यांच्या मनसे (MNS) या पक्षाचा अजेंडा ‘मराठी माणूस’ असा होता. आता ‘हिंदुत्त्व’ असा करण्यात आला आहे. हे योग्यच झाले कारण हिंदुत्त्वात मराठीपण सुरक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपले मराठीपण व्यवस्थित जपून हिंदुत्त्वाचे राजकारण केले. मराठी आणि हिंदुत्त्व हे इतके एकरुप आहे की मराठीसाठी हिंदुत्त्व विसरायची गरज पडत नाही आणि हिंदुत्त्वासाठी मराठीपण विसरायची गरज पडत नाही.

ही निवडणूक राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेसाठी (MNS) अतिशय महत्त्वाची आहे. गेल्या निवडणुकीत राज ठाकरे हे पूर्णपणे मोदी-विरोधक म्हणून समोर आले आणि त्याचा फटका त्यांच्या पक्षाला बसला. यंदा त्यांनी हिंदुत्त्वाचा झेंडा हातात घेतला आहे. या निवडणुकीत त्यांना मिळणाऱ्या यश-अपयशावर मनसेचे (MNS) भवितव्य टिकून आहे. महाराष्ट्रभरात १०-१५ आमदार निवडून आणण्यास जर ते यशस्वी झाले तर त्यांचे अस्तित्व पुन्हा एकदा दिसून येईल. मात्र ५ पेक्षा कमी आमदार निवडून आले तर मात्र हा एक सामान्य पक्ष बनून राहील.

(हेही वाचा – Sanjay Shirsat यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल )

आपण या लेखात वरळी मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत. गेल्या विधानसभेत आदित्य ठाकरे वरळीतून लढले आणि जिंकले. कारण त्यांच्यासमोर तगडा प्रतिस्पर्धी नसेल याची काळजी घेण्यात आली होती. आदित्य ठाकरेंना ८९,२४८ मते मिळाली. मात्र ही जागा युतीमध्ये लढवली होती. विशेष म्हणजे आदित्य यांचे काका राज ठाकरे यांनी २०१९ मध्ये आपला उमेदवार उभा केला नव्हता. याचा फायदा आदित्य ठाकरेंना झाला. आता २०२४ मध्ये मनसे संदीप देशपांडेंना आदित्य यांच्या विरोधात उभे करणार असल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) सख्खे चुलत बंधू. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेचा वारस होण्याचे टाळले, तरी देखील त्यांना अंतर्गत वादाला सामोरे जावे लागले आणि त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन मनसेची स्थापना केली. राज ठाकरे यांचे वैशिष्ट्य असे की, कितीही वैर असले तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घाणेरडे राजकारण केले नाही. त्यांनी कौटुंबिक-धर्म व्यवस्थित पाळला आहे. उद्धव ठाकरेंवर ठाकरे शैलीतील टीका करायचेही ते टाळत आले आहेत. कितीही वाद असले तरी आपल्या पुतण्याचा पराभव निवडणूकीत होऊ नये याची काळजी घेतली. पण त्याबदल्यात उद्धव ठाकरे यांनी कोणतेच सौजन्य दाखवले नाही. उलट मनसेचे नगरसेवक फोडून राज ठाकरे यांना जोरदार धक्का दिला. आता इतकी सहनशीलता दाखवल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दया-माया न दाखवता विधानसभेच्या निवडणुकीत उडी घ्यायला हवी. महाभारताचे युद्ध सुरु होण्यापूर्वी धर्मराजांनी विरोधी पक्षातल्या सर्व ज्येष्ठांना वैयक्तिकरित्या नमस्कार केला. भीष्म, द्रोणाचार्य इत्यादी लोकांनी त्यांना नाईलाजाने आशीर्वाद दिला. पण धर्मराजाने युद्धभूमीत शस्त्रे टाकली नाहीत. त्याने युद्ध केले आणि जिंकून दाखवले.

(हेही वाचा – Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा देण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी; हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाची मागणी)

जर समोरची व्यक्ती कोणत्याही प्रकारचा धर्म पाळत नसेल, कौटुंबिक-धर्म, युती-धर्म, हिंदू-धर्म तर आपणही धर्मराजाप्रमाणे युद्ध करण्यास सज्ज झाले पाहिजे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनात आदित्य ठाकरेंविषयी ममत्व असेल. पण विषय आदित्य यांचा नसून त्यांचे पिताश्री उद्धव ठाकरेंचा आहे. त्यांनी हिंदुत्त्व सोडले असल्यामुळे प्रत्येक हिंदूने त्यांना निवडणुकीत धडा शिकवणे गरजेचे आहे. आदित्य तरुण असल्याने, त्यांना अधिक समज असल्याने त्यांनी आपल्या वडिलांना समजवले पाहिजे की ‘हिंदुत्त्व ही आपल्या कुटुंबाची ओळख आहे. ती ओळख तुम्ही कशी पुसून टाक बाबा?’ आणि आदित्य यांना इतकी समज नसेल तर ते उद्धव यांच्या वैचारिक गोंधळात सापडले आहेत असे म्हणावे लागेल. राज ठाकरे यांनी त्यांना त्या वैचारिक गोंधळातून बाहेर काढले पाहिजे. लहान मुलाला समजवायला बऱ्याचदा छडीचा मार द्यावा लागतो. यामागे पालकांची भावना पवित्र असते. त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांनाच आदित्य यांच्या समोर उभे करून निवडणूक लढवली पाहिजे. जेणेकरुन अमित ठाकरे यांना तरुण वयात आमदार होण्याचा अनुभव घेता येईन, हिंदुत्त्वाची सेवा करता येईल. दुसरी गोष्ट हा आदित्य ठाकरे यांचा पराभव नसणार तर हिंदुत्त्व सोडणाऱ्यांचा पराभव असणार आहे. या व्यापक वृत्तीने राज ठाकरेंनी (Raj Thackeray) या वरळीच्या निवडणुकीकडे पाहिले पाहिजे. कारण आमदारकी, खासदारकीपेक्षा हिंदुत्त्व अधिक मोठे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.