-
ऋजुता लुकतुके
भारतीय पथकाची यंदाची ऑलिम्पिक वारी ही, ‘पेला अर्धा भरलेला आहे की, पेला अर्धा रिकामा आहे?’ असा प्रश्न विचारणारी होती. म्हणजे आधीच्या कामगिरीच्या तुलनेत ६ पदकं ही वाईट कामगिरी नक्कीच नाही. ऑलिम्पिकच्या इतिहासात अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) आणि नीरज चोप्रा (Neeraj Chopra) या दोनच खेळाडूंनी भारताला वैयक्तिक सुवर्ण मिळवून दिलं आहे. त्यामुळे अचानक सुवर्ण पदकांचा रतीब पडावा अशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे. पण, त्याचवेळी ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी १० पदकांची जी अपेक्षा पथकाकडून ठेवली जात होती, ती मात्र पूर्ण झाली नाही. (Paris Olympic 2024)
नीरज चोप्राचं सलग दुसरं ऑलिम्पिक पदक आणि मनू भाकरचा (Manu Bhaker) एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याचा विक्रम या गोष्टी भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या. ११७ खेळाडूंच्या पथकाने अखेर १ रौप्य आणि ५ कांस्य अशी ६ पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला पहिलं कांस्य जिंकून दिलं. आणखी दोनच दिवसांनी तिने सरबज्योतसह मिश्र सांघिक प्रकारात दुसरं कांस्य जिंकलं. त्यानंतर १ ऑगस्टला थ्री पोझिशन रायफल प्रकारात महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेनं कांस्य जिंकलं. पहिल्याच आठवड्यात अशी तीन पदकं हातात आल्यावर दुहेरी आकडा गाठणं शक्य वाटत होतं. इतक्यात पुढचे सात दिवस हे पदकांच्या दुष्काळाचे आणि चौथ्या क्रमांकाचे गेले. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- DCM Devendra Fadnavis :अंधेरी पश्चिम येथील वीस वर्षे रखडलेला बसेरा झोपु गृहप्रकल्प अखेर लागणार मार्गी)
स्पर्धेच्या अकराव्या दिवसी विनेश फोगाटने (Vinesh Phogat) अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करून अगदी सुवर्ण पदकाच्या आशाही निर्माण केल्या. पण, त्याचवेळी वजनाच्या चाचणीत ती नापास झाल्यामुळे तिला अपात्रच ठरवण्यात आलं. भारतीय पथकासाठी हा मोठा धक्का होता. त्याचा परिणाम इतर कुस्तीपटूंवरही झाला. अंतिम आणि अंशू पहिल्याच फेरीत बाद झाल्या. (Paris Olympic 2024)
पण, त्यानंतरचा दिवस भारतासाठी पुन्हा एकदा यश घेऊन आला. आधी हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलं. तर पाठोपाठ नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावलं. हंगामातील सर्वोत्तम भालाफेक नोंदवूनही नीरजला पाकिस्तानच्या नदीम अरशदने विक्रमी फेकीसह दुसऱ्या क्रमांकावर ढकललं. या दोन पदकांमुळे भारताची एकूण पदक संख्या आता पाचवर पोहोचली. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Mumbai Metro 9 : विरार लोकलची गर्दी कमी होणार? कशी आहे मेट्रो 9 ची मार्गिका? वाचा सविस्तर…)
मीराबाई चानूकडून अपेक्षा होत्या. पण, १९९ किलो वजन उचलून ती तिसरी आली. पण, अमन सेहरावत या कुस्तीत पात्र ठरलेल्या एकमेव पुरुष मल्लाने स्पर्धा संपण्याच्या दोन दिवस आधी कांस्य पदक जिंकत भारताचं सहावं पदक निश्चित केलं. ६ पदकं चांगली की वाईट अशी चर्चा मग क्रीडा वर्तुळात सुरू झाली. पण, भारताचा पहिला वैयक्तिक सुवर्ण विजेता अभिनव बिंद्राने याला चोख उत्तर दिलं आहे. ‘६ पदकं आणि त्यात सुवर्ण नाही म्हटल्यावर कमी वाटू शकतात. पण, या कामगिरीचा सखोल विचार केलात तर तुम्हाला सत्य कळेल. प्रत्येक खेळात भारतीय खेळाडू पुढे होते. त्यांनी लढत दिली. आणि अनेक जण चौथ्या क्रमांकावरही राहिले. निकाल हा वेगळा मुद्दा झाला. पण, नवीन नवीन खेळाडू पूर्वी भारताची चलती नव्हती अशा खेळांत पुढे येत आहेत. जागतिक स्तरावर स्पर्धा करत आहेत, याचा मला आनंद आहे,’ असं अभिनव बिंद्रा म्हणतो. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community