राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे विविध पुरस्कार मंगळवार, १३ ऑगस्ट रोजी जाहीर झाले. त्यावेळी संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध गायिका शुभदा दादरकर यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराच्या घोषणेनंतर शुभदा दादरकर यांनी हा पुरस्कार आपण ४० वर्षे निरपेक्ष भावाने केलेल्या नाट्यसंगीताच्या (Musical Theatre) सेवेला मिळाला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काय म्हणाल्या शुभदा दादरकर?
मागील ४० वर्षे मी नाट्य संगीताची (Musical Theatre) सेवा केली. विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाट्य संगीताचा डिप्लोमा अभ्यासक्रम तयार केला. त्यामधून मागील २० वर्षांत हजाराहून अधिक विद्यार्थी नाट्य संगीत शिकून उत्तीर्ण झाले. त्यातील २५-३० विद्यार्थी आज व्यावसायिक दृष्टीने गात आहेत. निरपेक्ष भावाने संगीताची सेवा केली, म्हणून संगीत रंगभूमीचे आद्यदैवत संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नावाने आपल्याला पुरस्कार जाहीर झाला आहे. याविषयी आपण कृतज्ञ आहे, असे शुभदा दादरकर ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या प्रतिनिधीसोबत बोलताना म्हणाल्या.
(हेही वाचा कलरफुल ‘संगीत बावनखणी’ नाटकाचा मुहूर्त)
माझे वडील विद्याधर गोखले यांच्या पुण्याईने त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून मी आणि माझे पती मार्गक्रमण करत आहे. विशेष म्हणजे १९९५ साली मी जे ‘संगीत बावनखणी’ नाटक बसवले होते, ते पुन्हा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी कुणीही व्यावसायिक कलाकार नसणार, तर विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानचे विद्यार्थीच हे नाटक बसवत आहेत. त्याचा प्रारंभ सोमवारी, १२ ऑगस्ट रोजी झाला आणि मंगळवार, १३ ऑगस्ट रोजीच आपल्याला राज्य सरकारचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला, या योगायोग आहे, असेही शुभदा दादरकर म्हणाल्या. (Musical Theatre)
Join Our WhatsApp Community