आधी हिंदुत्वासाठी विरोधकांना नडले, आता एकमेकांनाच भिडले!

इतकी वर्षे आम्हाला जे जमले नाही, ते महाविकास आघाडी स्थापन झाल्याने जमले, जे होते ते चांगल्यासाठीच होते, अशा प्रतिक्रिया काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सेनाभवनासमोरील राड्यावर दिली. 

150

शिवसेना-भाजप…हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेले हे दोन पक्ष…या दोन्ही पक्षांनी २५ वर्षांहून अधिक काळ हिंदुत्वाच्या मुद्यावर विरोधकांवर जोरदार हल्ले चढवले…पण आज हे दोन्ही पक्ष एकमेकांचे इतके दुष्मन झालेत की, आता हे दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष एकमेकांची डोकी फोडताना दिसत आहेत…आणि तेही राम मंदिराच्या मुद्यावर. मात्र याचा सर्वाधिक आनंद हा आता विरोधकांना होत आहे. काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना या वादावर विचारले असता त्यांनी एकाच विचारसरणीचे दोन पक्ष एकमेकांचे वाभाडे काढत असतील, तर वेगळे काही सांगण्याची गरज नसल्याचे म्हणत आहेत. तर काहींनी तर जे इतकी वर्षे आम्हाला जे जमले नाही, ते महाविकास आघाडी स्थापन झाल्याने जमले, जे होते ते चांगल्यासाठीच होते, अशा प्रतिक्रिया काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सेनाभवनासमोरील राड्यावर दिली. 

काँग्रेस-राष्ट्रवादीला फुटल्या उकळ्या!

विधानसभा निवडणुकीनंतर जनतेने शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट कौल दिला, तरी देखील शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात पकडत आपल्या जुन्या जाणत्या हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या पक्षाला थेट विरोधी बाकावर बसवले. आता राज्यात एकेकाळचे हे दोन मित्र कट्टर वैरी झाले असून, या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकमेकांची डोकी फोडण्या इतपत मजल गेली. जे काँग्रेस-राष्ट्रवादीला इतकी वर्षे जमले नाही ते महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर प्रत्यक्षात सत्यात उतरत असल्याचे पाहून काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. एवढेच नाही तर या दोन्ही पक्षाच्या वादावर देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाष्य न करता फक्त आनंद घेत आहेत.

(हेही वाचा : भाजपचा शिवसेनेविरोधात फटकार मोर्चा! सेना भवनसमोर राडा)

शिवसेना-भाजपची बदनामी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पथ्यावर!

दरम्यान राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याने शिवसेनेच्या हिंदुत्वावर जोरदार टीका होऊ लागली आहे. जुने जाणते शिवसैनिकदेखील यामुळे खूश नाहीत. तर भाजपच्याही काही जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना हे दोन्ही पक्ष वेगळे होणे पटलेले नाही. त्यातच आता हो दोन्ही पक्ष आता आपापसात इतके भिडू लागल्याने त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच सर्वाधिक भविष्यात होणार, असे काही शिवसेनेतील आणि भाजपतील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नेहमीच हिंदुत्वाचा विरोध केला आता ते दोन्ही पक्ष या दोन पक्षामधील वादाचा आनंद घेत असतील, असे देखील काही कार्यकर्त्यांते म्हणणे आहे. तसेच कट्टर काँग्रेस समर्थक देखील ‘जो हो रहा है वो अच्छे के लिए ही होता है’ असे खासगीत बोलू लागले आहेत.

बाळासाहेब-महाजनांचा कार्यकर्त्यांना विसर पडला का?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी, अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या सगळ्या धुरंदर राजकारण्यांनी युतीची मुहूर्तमेढ रोवली होती. या युतीला ग्रहण कधीच लागले नाही, पण आता त्यांच्या विचारांचा या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना विसर पडला आहे का?, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

(हेही वाचा : देशात लोकशाही, दंडुकेशाही चालणार नाही! चंद्रकांत पाटलांनी ठणकावले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.