नसीम खान यांच्यासमोर उबाठा शिवसेनेचेच आव्हान, Varsha Gaikwad यांची साथ कुणाला असणार?

139
नसीम खान यांच्यासमोर उबाठा शिवसेनेचेच आव्हान, Varsha Gaikwad यांची साथ कुणाला असणार?

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या विजयी झाल्या असल्या तरी या मतदारसंघातील चांदिवली विधानसभा क्षेत्रावर मात्र उबाठा शिवसेनेकडून दावेदारी सांगितली जात आहे. चांदिवली विधानसभेत शिवसेनेचा आमदार निवडून आलेला असल्याने ही जागा सेनेला सोडण्याची मागणी उबाठा शिवसेनेकडून होत असल्याने पुन्हा आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या माजी मंत्री नसीम खान यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी उबाठा शिवसेनेने मोठा प्रयत्न केला होता. आणि त्याची परतफेड म्हणून आता वर्षा गायकवाड या चांदिवली विधानसभा क्षेत्र उबाठा शिवसेनेला सोडून करणार आहे. त्यामुळे एक प्रकारे उबाठा शिवसेना पक्ष हा मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या मदतीने नसीम खान यांचे चांदिवलीतील अस्तित्वच संपवणार असल्याची माहिती मिळत आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात बलस्थानी भाजपा असूनही महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या विजयी ठरल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड या केवळ १६ हजार मतांनी विजयी ठरल्या. या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना ४ लाख ४५ हजार ५४५ मते मिळाली, तर भाजपाचे उज्ज्वल निकम यांना ४ लाख २९ हजार ०३१ मतदान झाले. या निवडणूक निकालामध्ये चांदिवली मतदारसंघात निकम यांना ९८ हजार ६६१ आणि गायकवाड याना १ लाख ०२ हजार ९८५ मते मिळाली. जिथे भाजपा आणि शिवसेनेची ताकद असली तरी काँग्रेस नेते नसीम खान यांचाही विभाग आहे. त्यामुळे भाजपाने त्यांना या मतदार संघात जास्त लिड घेऊ दिले नाही. पण भाजपालाही जास्त मिळवता आले नाही.

(हेही वाचा – उत्तर मुंबईतील रखडलेले प्रकल्प, रस्त्यांची कामे मार्गी लागणार; Piyush Goyal यांची ग्वाही)

मतदारसंघ कायम राखण्यासाठी नसीम खान यांच्याकडून प्रयत्न

चांदिवली विधानसभा क्षेत्रात सध्या शिवसेनेचे दिलीप (मामा) लांडे हे आमदार आहेत. आणि सध्या ते शिवसेनेत असल्याने या मतदारसंघात उबाठा शिवसेनेच्या वतीने दावा केला जात आहे. या मतदार संघात कायमच नसीम खान यांचा वरचष्मा राहिला होता. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार म्हणून दिलीप लांडे हे अवघ्या काही मतांनी विजयी झाले. मात्र, काठावर पराभव झाल्याने पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मतदारसंघ कायम राखण्यासाठी नसीम खान यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत नसीम खान यांच्या नावाची चर्चा होती. परंतु उबाठा शिवसेनेने नसीम खान यांच्या ऐवजी धारावीच्या आमदार आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यासाठी दिल्ली हायकमांडकडे शब्द टाकला. त्यामुळे नसीम खान यांचा पत्ता कापला गेला. परंतु नसीम खान यांनी वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर, आता हा मतदारसंघ काँग्रेसला न सोडता, तो उबाठा शिवसेनेला सोडला जावा, यासाठीच जोरदार प्रयत्न केला जात आहे. उबाठा शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी चांदिवली मतदारसंघ हा आमचाच असून त्या ठिकाणी आमच्या पक्षाचा उमेदवार दिला जाईल असे जाहीर सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चांदिवलीच्या जागेवर जागा उबाठा शिवसेनेने दावेदारी सांगितल्याने खान यांना आपल्याच मतदारसंघात तिकीट मिळवण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ येणार असल्याची माहिती मिळत आहे.

नसीम खान यांचे प्रस्थ वाढल्यास त्याचा धोका मुंबईत खासदार वर्षा गायकवाड यांनाही आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेला पुढे करून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) चांदिवली विधानसभा क्षेत्र हे शिवसेनेच्या वाट्याला देऊन एक प्रकारे नसीम खान यांचाच काटा काढणार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच चांदिवली विधानसभा क्षेत्रात नसीम खान यांचे मोठे प्रस्थ असल्याने त्यांचा पत्ता कापल्यास, भविष्यात या मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आणण्यात यश येईल, असा विश्वास उबाठा शिवसेनेला वाटत आहे. कारण हिंदू आणि मुस्लिम ही दोन्ही मतांच्या बेरजेवर उबाठा शिवसेनेला आपला एक आमदार वाढवता येणार आहे. त्यामुळे उबाठा शिवसेना चांदिवली मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नाही. मामा लांडे यांच्या रूपात शिवसेनेचा आमदार हा निवडून असल्याने हा मतदारसंघ आपल्या हातून जाऊ द्यायचा नाही असा पण उबाठा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चांदिवली विधानसभा क्षेत्र हे काँग्रेस ऐवजी उबाठा शिवसेनेकडे गेलेले पाहायला मिळेल असे बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.