गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा; CM Eknath Shinde यांचे निर्देश

208

गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत. त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत,  असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी दिले. दरवर्षी प्रमाणे यंदाही  गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफी देण्याची घोषणा करताना शिंदे यांनी राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

येत्या ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या उपस्थितीत  आज  सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि  सुव्यवस्थेचा आढावा तसेच  पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली. यावेळी बोलताना शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती, ती यावर्षीही कायम राहील.  त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी य़ोजना राबवावी, अशा सूचना केल्या.

गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने  बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी बैठकीत दिला.  राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहन तैनात करावेत, अशी सूचनाही त्यांनी (CM Eknath Shinde) केली.

(हेही वाचा Love Jihad : उल्हासनगरमधील दृष्टी झाली आयेशा; धर्मांतरासाठी मुसलमानांनी गाठली खालची पातळी )

महापालिकांनी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्निशमन  वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये. सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही शिंदे यांनी सांगितले.  पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मूर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बैठकीत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रमुख तसेच विविध गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना हर घर तिरंगा मोहिम यशस्वी करण्याचे आवाहनही केले.

या बैठकीला  उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे  पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे  पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त  मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त  मुख्य सचिव विकास खारगे, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त  मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त  मुख्य सचिव आभा शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण  दराडे,  सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर,  पर्यावरणपूरक सजावट उत्सवी संस्थेचे शाम शेंडकर आदी उपस्थित होते.  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलीस  प्रमुख यावेळी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.