रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे… विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाते. मात्र आता सर्वसामान्य मुंबईकरांना मनात नसतानाही हा गुन्हा करावा लागत आहे, आपली नोकरी वाचवण्यासाठी आणि पोटापाण्यासाठी…
लोकल ही मुंबईची लाईफलाईन समजली जाते. याच लोकलमधून रोज लाखोंच्या संख्येन मुंबईकर आपली रोजीरोटी कमावण्यासाठी प्रवास करत असतात. याच लोकलमुळे मुंबईकरांचा प्रवास देखील सुकर होतो. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ठाकरे सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचा प्रवास बंद केला आणि त्याचा त्रास सर्वसामान्य मुंबईकरांना होऊ लागला आहे. आधीच गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या असताना, आता एप्रिलपासून लोकल बंद असल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत.
(हेही वाचाः …म्हणून सर्वसामांन्यांना लोकलसाठी अजून बघावी लागणार ‘वाट’!)
म्हणून करावा लागतो विना तिकीट प्रवास
आता मुंबईकर आपली नोकरी टिकवण्यासाठी आणि पोटासाठी लोकलमधून विना तिकीट प्रवास करू लागले आहेत. राज्यात आता हळूहळू नियम शिथिल होऊ लागल्याने, अनेक खासगी कार्यालयांनी आपआपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता नाईलाजास्तव सर्वसामान्य मुंबईकर विना तिकीट प्रवास करू लागले आहेत. म्हणून ठाकरे सरकारने लवकरात लवकर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल प्रवास सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
(हेही वाचाः शिक्षकांच्या लोकल प्रवासाच्या विषयावर शालेय शिक्षण विभाग ढिम्मच! )
मुंबईकर अशी लढवतात शक्कल
काही महत्वाच्या स्टेशन्सवर टि.सी. उभे असतात. त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी न उतरता आधीच्या स्थानकांवर उतरुन मग बस किंवा टॅक्सीने मुंबईकर आपले कामाचे ठिकाण गाठतात. काहींनी तर बनावट ओळखपत्र देखील तयार करुन घेतले असून, या बोगस ओळखपत्रावर काही जण रेल्वेचा पास काढत आहेत. मात्र ज्यांना पास मिळत नाहीत, असे चाकरमानी विना तिकीट प्रवास करणेच पसंत करत आहेत.
सरकार मुंबईकरांना गुन्हेगार बनवंतय का?
लोकल मधील विना तिकीट प्रवासाबाबत रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांना विचारले असता, त्यांनी ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेला दोषी ठरवले आहे. आज मुंबईकर जे विना तिकीट प्रवास करत आहेत, त्याला फक्त आणि फक्त हे सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले. आज मुंबईच्या रस्त्यावर धावणारी एसटी देखील तुम्ही बंद केली. मग लोक आपल्या कामावर येणार तरी कसे? याचमुळे मुंबईकरांना मनात नसतानाही नाईलाजाने विना तिकीट प्रवास करावा लागत असल्याची टीका गुप्ता यांनी केली. मुंबई-ठाणे-नवी मुंबई या एमएमआर मधील रुग्ण संख्या कमी असताना देखील, मुख्यमंत्र्यांनी तिथले निर्णय घेण्याची जबाबदारी महापालिकांकडे सोपवली आहे. त्यामुळेच मुंबईकरांचे जे हाल होतात त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री आणि पालिका जबाबदार असल्याचे गुप्ता म्हणाले.
(हेही वाचाः सर्वसामन्यांसाठी खुशखबर, मध्य रेल्वेत ‘यांना’ मिळणार लोकलचा प्रवास)
15 दिवसांत वाढली इतकी प्रवासी संख्या
मध्य रेल्वे
5 जून – 11 लाख
10 जून – 12 लाख 50 हजार
15 जून – 15 लाख
पश्चिम रेल्वे
5 जून – 9 लाख 50 हजार
10 जून – 13 लाख
15 जून – 16 लाख
(हेही वाचाः 15 दिवसांत लोकल प्रवाशांची संख्या पोहोचली 31 लाखांवर!)
प्रवासी- रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये वाद वाढले
लोकलबंदी कायम असल्याने सामान्य नागरिक आणि रेल्वे कर्मचारी आमने-सामने येत आहेत. अनेकदा हा वाद टोकाला जाऊन हाणामारीचे प्रसंग उद्भवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विना तिकीट लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड भरायला सांगितला, म्हणून दोन प्रवाशांनी मुख्य तिकीट निरीक्षक विकास पाटील यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार दिवा स्थानकात नुकताच घडला होता. तर घरावर पत्रा बसवण्याचे काम करणारे एक प्रवासी शिवाजी जाधव यांना कुर्ला ते पनवेल असा प्रवास करायचा होता. यासाठी ते कुर्ला स्थानकातील तिकीट खिडकीवर रेल्वे तिकीट घेण्यासाठी गेले असता, अत्यावश्यक सेवेत नसल्याने रेल्वे तिकीट मिळणार नसल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. विनंती करुनही तिकीट मिळत नसल्याने अखेर जाधव आणि संबंधित कर्मचारी यांच्यात वाद झाला. अखेर रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला.
(हेही वाचाः मुंबईत निर्बंध, लोकल बंद, तरी सरकारचे फर्मान ‘शिक्षकांनो, शाळेत हजर व्हा!’ )
किती काळ दडपशाही सहन करायची?
अत्यावश्यक सेवेत नसलेल्या अनेक सर्वसामान्य प्रवाशांना या त्रासातून सध्या जावे लागत आहे. लॉकडाउन काळात आधीच कमाई नव्हती. आता पावसाळ्याच्या तोंडावर कमाईची संधी मिळाल्यावर रेल्वेकडून तिकीट देण्यात येत नाही. विना तिकीट प्रवास केल्यास टि.सी. दंड आकारतात. आणखी किती काळ रेल्वेकडून ही दडपशाही सुरू राहणार आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
मी नालासोपारा येथे राहतो. नालासोपारा ते दादर असा रोज बसने प्रवास करणे शक्य नाही. त्यातच आता माझ्या कंपनीने जर रोज ऑफिसला आले नाही तर पगार कापण्याची धमकी दिली. त्यामुळे मी रोज विना तिकीट प्रवास करतो. नोकरी वाचवण्यासाठी मी हे करतो. माझ्यावर कारवाई झाली तरी मला फरक पडत नाही.
-प्रदीप, संतप्त रेल्वे प्रवासी
Join Our WhatsApp Communityमी गोरेगाव येथे नोकरी करते. मी रहायला पनवेलला असून, मला रोज बसने प्रवास करणे शक्य नाही. त्यामुळे मी विना तिकीटच प्रवास करते. आपल्याला टि.सी. पकडतील अशी मला रोज भीती असते. पण माझाही नाईलाज आहे, मी नोकरी टिकवण्यासाठी ही जोखीम पत्करत आहे.
-महिला प्रवासी