Mumbai Water Problem : जलवाहिन्यांवरील गळती शोधून काढण्‍यासाठी आयुक्तांचे निर्देश! म्हणाले…

1201
Mumbai Water Problem : जलवाहिन्यांवरील गळती शोधून काढण्‍यासाठी आयुक्तांचे निर्देश! म्हणाले...

मुंबईत सध्‍या काही निवडक ठिकाणांहून पाणी पुरवठयाबाबतच्‍या तक्रारी येत असून जलवाहिन्यांवरील गळती तातडीने शोधून काढावी, गळती शोधून काढण्‍यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करावा, विविध पाळ्यांमध्ये कर्मचारी नियुक्त करावेत, पाणी गळती सापडल्यानंतर ती विनाविलंब दूर करावी, असे निर्देश महानगरपा‍लिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले

मुंबईत काहीं निवडक भागात सध्या पाणी गळती, पाणी कमतरता याबाबतच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपा‍लिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बैठक घेत जल अभियंता विभागाने करावयाच्या अपेक्षित कार्यवाही बाबत निर्देश दिले. अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, जल अभियंता पुरूषोत्तम माळवदे यांच्‍यासह संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. (Mumbai Water Problem)

(हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली इच्छा; Muhammad Yunus यांनी फोन करून केली बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेची निश्चिती)

महानगरपा‍लिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी म्‍हणाले की, भांडूप संकूल व पिसे पांजरापूर संकूल जलप्रक्रिया केंद्रातील पाण्‍याची पातळी योग्‍य राखण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले आहेत. तथापि, संभाव्य गळती, पाण्याचा उपसा वाढणे आणि बेकायदेशीर मोटर पंपांचा वापर यासोबतच दूषित पाणीपुरवठ्याचा स्रोत शोधला पाहिजे, या गोष्टींवर देखरेख ठेवणे गरजेचे आहे.

अनधिकृत प्रकार आढळल्यास मोटारपंप जप्त करा..

पाण्याचा उपसा जेवढा सुनिश्चित केला आहे, तेवढाचा केला पाहिजे. पाण्‍याचा अतिरिक्त उपसा होणार नाही, याची दक्षता बाळगली पाहिजे. त्‍याचबरोबर ‘व्हॉल्व्ह ऑपरेशन’ वर संपूर्ण नियंत्रण ठेवून पाणीवाटप कोट्यानुसार संपूर्ण कार्यक्षेत्राला पाणीपुरवठा होतो की नाही यावरही देखरेख ठेवली पाहिजे. बेकायदेशीर मोटार पंप, अनधिकृत नळजोडण्या यांना आळा बसावा म्हणून पथके गठीत करणे, असे अनधिकृत प्रकार आढळल्यास मोटारपंप जप्त करावेत, तसेच दंडात्मक कारवाई करावी.

विकास कामांमुळे जलवाहिनींना पोहोचते हानी…

मुंबईतील महानगरपालिकेसह इतर प्राधिकरणांमार्फत रस्‍ते विकासासह इतर कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांमुळे मुंबईत पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींना काही ठिकाणी हानी पोहोचते. परिणामी, संबंधित परिसरातील पाणी पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच, संबंधित यंत्रणेला या बाबत त्‍वरित अवगत करावे आणि तातडीने त्‍याची दुरूस्‍ती करावी, याची दक्षता घेण्‍याचेही आदेश गगराणी यांनी दिले. (Mumbai Water Problem)

(हेही वाचा – घाटकोपर Green Waste Project बंद, आगीच्या दुर्घटनेनंतर पुन्हा प्रकल्प सुरु होईना)

लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घ्या!

पाणीपुरवठ्याविषयी लोकप्रतिनिधींकडून विविध सूचना, तक्रारी प्राप्‍त होताच त्‍याची तातडीने दखल घ्‍यावी. त्‍यांना त्वरित प्रतिसाद द्यावा. त्‍या तक्रारीची कार्यवाही विनाविलंब व्हावी, लोकप्रतिनिधींच्या तक्रारींच्या निराकरणाबाबत त्वरित माहिती द्यावी, असेदेखील गगराणी यांनी नमूद केले. जल विभागाचे दुय्यम अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता इत्यादी सर्व यंत्रणेने प्रत्‍यक्ष कार्यस्थळावर (Field) उपस्थित रहावे. नागरिकांच्या घरात, परिसरात नळांना येणारे पाणी पुरेशा दाबाने, स्वच्छ येते का याची खातरजमा करत, या आधारे पाणीपुरवठा योग्य होत आहे की नाही, याची नोंद घ्यावी. नागरिकांनी पाणीपुरवठाविषयक तक्रारींसाठी १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले.

या भागातील पाणी समस्येवर झाली चर्चा..

एफ दक्षिण विभागातील टी. जे. मार्ग, गाडी अड्डा, क्रीसेंट बे, जेरबाई वाडिया रस्ता, गं. द. आंबेकर मार्ग, भोईवाडा स्मशानभूमी, एफ उत्तर विभागातील जोगळेकर वाडी, जी दक्षिण विभागातील सेंच्युरी मिल म्हाडा कंपाऊंड, सीताराम जाधव मार्ग, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड याचबरोबर वांद्रे (पूर्व) येथील खारदांडा, आप्पा पाडा, क्रांती नगर, मालाड दिंडोशी, बोरिवली येथील राजेंद्र नगर आदी क्षेत्रात कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारींचा यावेळी क्षेत्रनिहाय आढावा घेण्यात आला. तसेच दुय्यम अभियंता, सहायक अभियंत्यांना विचारणा करत तक्रारींचा जलद गतीने आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने निपटारा करावा, याबाबत निर्देश देण्यात आले. (Mumbai Water Problem)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.